६ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना जंतनाशक गोळी देणार

उपराजधानी नागपूर
  • २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान जंतनाशक सप्ताह

नागपूर : मातीच्या संपर्कात आल्यामुळे अस्वच्छ हाताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पोटात जंत जाण्याची शक्यता लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेतर्फे विद्यार्थ्यांनी जंतनाशक गोळी घ्यावी यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार आहे. २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान जंतनाशक सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. सध्या शाळा बंद असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन आशा वर्कर्सच्या माध्यमातून जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

याबाबत बुधवारी (ता. १५) मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. साजीद खान, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, नोडल अधिकारी डॉ. मंजू वैद्य, कोव्हिड लसीकरणचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, झोनल आरोग्य अधिकारी डॉ.सुनील कांबळे, डॉ. भावना सोनकुसळे, डॉ.पांडे, डॉ. जैतवार, डॉ. प्रीति, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ.माने, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. अतिक खान, डॉ. भोयर व दीपाली नासरे उपस्थित होते.

नोडल अधिकारी डॉ. मंजू यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिन, मॉप-अप दिन आणि २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान पाळण्यात येणार असलेल्या जंतनाशक सप्ताहामध्ये राबविण्यात येणार विविध कार्यक्रमांची माहिती सादरीकरणातून दिली. ६ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व बालकांसाठी व किशोरवयीन मुलामुलींसाठी व १ ते १९ वर्ष वयोगटातील अंगणवाडी व शाळेत न जाणा-या बालकांसाठी व किशोरवयीन मुला-मुलींसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याकारणाने याबाबतची जनजागृती विविध माध्यमातून व्यापक प्रमाणावर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, शाळा प्रत्यक्ष सुरू नसल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी जंतनाशक गोळ्या घेतल्या अथवा नाही, याबाबत विचारणा करण्यात यावी, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केली. सध्या नागपूर शहरात कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. लसीकरण सुरू असलेल्या प्रत्येक केंद्रांवरही जंतनाशक गोळ्या देण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देशही अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी यावेळी दिले.

आजारी बालकांना गोळी नाही
जंतनाशक दिनी व मॉप-अप दिनी आजारी किंवा अन्य औषधे घेणाऱ्या बालकांना जंतनाशक गोळी दिली जाणार नाही. अशा बालकांनी ही गोळी आजारातून बरे झाल्यावरच देण्यात यावी, असे टास्क फोर्सच्या बैठकीत डॉ. मंजू यांनी सांगितले. गैरहजर अथवा आजारपण यामुळे ज्या बालकांना जंतनाशक दिनी हे औषध दिले गेले नसेल त्यांना २८ सप्टेंबर या मॉप-अप दिनी देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

काय करावे आणि काय करु नये?
औषधाची गोळी घशात अडकू नये यासाठी बालकाला नेहमी गोळी चावून खाण्यास सांगावे. १ ते २ वर्षे मधील बालकांना गोळीची पावडर करून द्यावी, आजारी बालकाला कधीही ही गोळी देऊ नये. ही गोळी चावल्याशिवाय गिळण्याची सूचना बालकाला देऊ नये, अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या. दुष्परिणाम उद्‌भवल्यास बालकाला उघड्या; परंतु छप्पर असलेल्या जागी नेऊन झोपवावे व विश्रांती घेण्यास सांगावी. पिण्याचे स्वच्छ पाणी द्यावे. लक्षणे गंभीर असून ती कायम राहिल्यास नजिकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

जंतसंसर्ग थांबविण्यासाठी काय करावे?
–  जेवणापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यावर हात स्वच्छ धुवावेत

–  पायात चपला, बूट घालावेत. निर्जंतुक व स्वच्छ पाणी प्यावे

–  व्यवस्थित शिजविलेले अन्न खावे

–  निर्जंतुक व स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धुवावीत.

–  नखे नियमित कापावीत व स्वच्छ ठेवावीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *