Home उपराजधानी नागपूर मनपा सायकल रॅली, कार सोडा, सायकल आणि मेट्रो पकडा

मनपा सायकल रॅली, कार सोडा, सायकल आणि मेट्रो पकडा

25

नागपूर : शहरामध्ये पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहे. यामध्ये नागरिकांनीही जबाबदारीने पुढाकार घ्यावा. यादृष्टीने सायकलचा प्रवास हा सर्वात सुरक्षित आणि स्वस्त आहे. शारीरीक सुदृढतेसह पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सायकल हे उत्तम वाहतूकीचे साधन आहे. यामध्ये सहभागी होत सर्वांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी सायकलचा उपयोग करावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने जागतिक ‘कार फ्री’ दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीचे [ CYCLE RALLY IN NAGPUR ] उद्घाटन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी लेडीज क्लब, सिव्हिल लाईन्स येथे बुधवारी (२३ सप्टेंबर) ला सकाळी केले. नागपूर महानगरपालिका, नागपूर पोलिस, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नागपूर मेट्रो, मिल्स अँड मिलर्स, सायकल फॉर चेंज, इंडिया पेडाल्स, लाफ्टर रायडर अँड रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीद्वारे सुदृढ आरोग्यासह पर्यावरण संरक्षण, पर्यावरणपूरक वाहनांचा वापर, सार्वजनिक वाहनांचा वापर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

अल्पसंख्याक उमेदवारांना निवासी पोलिस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण देणार

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, नागपूर शहरात पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देउन शहरातील प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्वाचा पुढाकार आहे. नागपुरात वाहतुकीकरीता मेट्रो रेल, आपली बसचा वापर करून नागपूरला वाहन प्रदूषणपासून मुक्त करण्यात नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. यासाठी चारचाकी वाहन, दुचाकी वाहनांचा उपयोग टाळा आणि पर्यावरणपूरक वाहनांचा वापर करा, असे आवाहनही त्यांनी केले.

रॅलीमध्ये सर्वात लहान सायकलपटू ११ वर्षीय अफान नरुल होता. ७८ वर्षीय ज्येष्ठ सायकल पटू डॉ. भूपेंद्र आर्य यांनी सुध्दा रॅलीत भाग घेतला. सर्वांनी दोघांचे अभिनंदन केले. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनीसुध्दा पर्यावरणपूरक वाहनांचा उपयोग करण्याचे आवाहन केले आहे.

‘कार सोडा, सायकल आणि मेट्रो पकडा’ अशा स्वरूपात पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेचा अंगिकार करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. मनपा आयुक्तांनी सुद्धा सायकल चालवून नागरिकांमध्ये जनजागृती केली. बायसिकल मेयर, आंतरराष्ट्रीय सायकल पटू डॉ.अमित समर्थ यांच्या नेतृत्वात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जितेंद्र नायक, प्रशांत उगमुगे, नरुल हक, अनिकेत शेगावकर, जितेन गोपवानी, सचिन पार्लेवार, सचिन शिरभावीकर आणि ज्योती पटेल प्रामुख्याने सहभागी झाले. महामेट्रोचे महेश गुप्ता, सुनील तिवारी, स्मार्ट सिटीच्या डॉ. प्रणिता उमरेडकर, राहुल पांडे, अमित शिरपूरकर, मनीष सोनी आदी सुद्धा उपस्थित होते. मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनीही सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला.
रॅलीमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांनी हातात राष्ट्रध्वज घेवून सहभाग नोंदविला. सगळ्यांनी ५ किलोमीटर सायकलचे मार्गक्रमण करून जनजागृती केली. महिला, पुरुष, वयोवृद्ध नागरिक, युवा आदी सायकलपटू रॅलीमध्ये उत्साहाने सहभागी झाले.