कौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा : सुनील केदार

उपराजधानी नागपूर

नागपूर : राज्य शासनाच्या कौशल्य विकास निर्मितीसह विविध विभाग व नागपूर शहरातील विविध उद्योग समुह यांच्यामध्ये व्यापक समन्वय आवश्यक आहे. युवा फाउंडेशन संस्थेने शासन आणि उद्योजक यांच्यामध्ये सेतू बांधावा. आवश्यक अभ्यासक्रमाची निर्मिती व त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी याकडे लक्ष घालावे, असे आवाहन क्रीडा युवक कल्याण तसेच पदुम मंत्री सुनील केदार [ SPORTS MINISTER SUNEEL KEDAR ] यांनी केले आहे.

अनेक देशी –विदेशी कंपन्यांना मिहानमध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून, येथील विविध कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागाला येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी श्री. केदार यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ को ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनच्या कार्यालयात आढावा बैठक पार पडली. युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष  कुणाल पडोळे यांच्यासह विविध कंपन्याचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

युवकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असताना कंपन्यांना मात्र कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याची बाब बैठकीत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी श्री. केदार यांच्या निदर्शनास आणून दिली. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि क्रीडा व युवक कल्याण, युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय आणि युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

न्यासा कम्युनिकेशन कंपनीची अकार्यक्षमता, आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर

कुशल मनुष्यबळ निर्माण करणाऱ्या शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि रोजगार निर्मिती कंपन्यांमध्ये  संवादाचा पूल बांधणे गरजेचे आहे. या संस्थांनी विद्यार्थ्यांच्या सॉफ्ट स्किलनिर्मितीवर विशेष लक्ष देत कंपन्यांच्या मागणीनुसार कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्माण करावे. हे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास सेवा देणाऱ्या कंपन्यांसोबत इतरही कंपन्यांच्या समस्या मार्गी लागतील. तसेच या कंपन्या स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देत आहेत. त्यामुळे युवकांचा दैनंदिन खर्चही वाचणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुशल मनुष्यबळासाठी युवकांना प्रशिक्षण देण्यासोबतच, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, संवाद कौशल्य, पायाभूत संगणक अभ्यासक्रम, मुलाखतीची तयारी करुन देणे यासाठी आवश्यक विविध अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून, युवकांचे समुपदेशन करण्यावर भर राहणार आहे. तसेच कंपन्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध करुन देण्याचा युवा फाऊंडेशनचा प्रयत्न राहणार असल्याचे कुणाल पडोळे यांनी सांगितले.

उद्योगसमुहांच्या मागणीनुसार युवकांनी रोजगारासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करावीत. येथील युवकांमध्ये मुलाखत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक संवाद कौशल्ये, सॉफ्टस्किल्स नाहीत. कंपन्यांनी अकुशल युवकांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्यात असलेली कामाप्रतीची उदासिनता ही मोठी समस्या कंपन्यांपुढे आहे. अल्पावधीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी असलेल्या शहराकंडे त्यांचा वाढता  कल, त्यांची बदलती जीवनशैली यासह इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसणे, हीसुद्धा मोठी अडचण असल्याचे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी श्री. केदार यांना सांगितले.

ब्रेनहंट, चानविम, सोलर इंडस्ट्रीज, एमईसीएल, टीएएसएल,ल्युपीन, झीम लेबोरेटरी, टॉपवर्थ ऊर्जा ॲन्ड मेटाब, ऑरेंट सिटी वॉटर, कॅप जेमिनी, लॉजिस्टिक्स, ॲचिस टेक्नॉलॉजी, टाटा प्रोजेक्ट, अलॅक्रीटी सोल्यूशन्स, जेनकिंग इंडिया आदी कंपन्यांचे प्रतिनिधी  बैठकीला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *