भारत सरकारच्या ‘या’ चार महिला प्रतिनिधींनी पाकिस्तानचे कान उपटले!

राष्ट्रीय

शिल्पा मुंदलकर

UNITED NATIONS GENERAL ASSEMBLY : काल परवा संयुक्त राष्ट्राच्या महासभेत (यूएनजीए) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा जुन्या काश्मीरच्या सुरांचा जप केला. त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र्र मोदी स्वत: पुढाकार घेणार असताना त्यांच्या भाषणापूर्वीच संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पहिल्या प्रतिनिधी स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. स्नेहा यांनी इम्रान खान यांचे खोटे आरोप उघड केले आणि पाकिस्तान दहशतवाद्यांना खुले समर्थन देत असल्याचे परखडपणे सांगितले.

स्नेहा यांच्या या आक्रमक भूमिकामुळे यूएनमध्ये पाकिस्तानला घेराव घालण्याच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. यापूर्वीही भारताच्या इनम गंभीर, पालोमी त्रिपाठी, विदिशा मैत्रा या महिला प्रतिनिधींनी पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आला होता.

2016 साली आपल्या जुन्या पद्धतीचा अवलंब करत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताची पहिली प्रतिनिधी एनाम गंभीर यांनी पाकिस्तानला दहशतवादी देश संबोधले. या देशात दहशतवादी फुलतात, त्यांची रांग लागलेली असल्याचे स्पष्ट सांगितले होते. याआधी 2015 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रात नवाज शरीफ यांनाही फटकारले होते.

नंतरच्या वर्षात अर्थात 2017 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चुकीचे चित्र दाखवून अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानवरील भारताच्या कायमस्वरूपी मिशनमध्ये नियुक्त केलेल्या पालोमी त्रिपाठी [ PALOMI TRIPATHI ] यांनी पलटवार केला. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी भारतावर आरोप केला होता. यात एका छायाचित्रात मुलीचा चेहरा पेलेट गनने जखमी झाल्याचे दिसत होते. मात्र, पालोमी यांनी ते चित्र खोटे ठरवले़ पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधीने पुन्हा एकदा जागतिक दहशतवादाचे केंद्र्रबिंदू म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेपासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला. गाझा मुलीच्या चित्राद्वारे भारताबद्दल खोटा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला. बनावट चित्राद्वारे बनावट कथा बनवण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी ठासून सांगितले.


2019 मध्ये यूएनजीएमध्ये आपल्या पहिल्या भाषणात पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत भारताविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली होती. यानंतर, संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा यांनी इम्रान यांच्या आरोपांना उत्तर दिले. ते ओसामा बिन लादेनचे खुले समर्थक नाहीत हे नाकारता येईल का? संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या 130 दहशतवादी आणि 25 दहशतवादी संघटना नसल्याची पाकिस्तान खात्री करू शकते का? संयुक्त राष्ट्रांच्या अल कायदा आणि इस्लामिक स्टेट प्रतिबंध यादीतील लोकांना पेन्शन देणारा हा जगातील एकमेव देश आहे, ही बाब पाकिस्तान मान्य करेल का? 27 पैकी 20 पैकी मापदंडांचे उल्लंघन केल्याबद्दल फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने ( FATF ) देशाला नोटिसा दिल्या हे पाकिस्तान नाकारेल का, अशी वास्तविकता समोर ठेवली होती.

आणि यंदा 2021 मध्येही पाकिस्तानने पुन्हा ‘मागील पानावरून पुढे’ हा क्रम सुरू ठेवला. काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आणि भारतावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप केला. संयुक्त राष्ट्रात भारताची पहिली प्रतिनिधी स्नेहा दुबे [ DIPLOMAT SNEHA DUBE ] यांनी यावेळी जगासमोर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड केला. पाकिस्तान नेहमीच आपल्या भूमीचा वापर दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी करत आला आहे. जगाला माहीत आहे की दहशतवादी ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात आश्रय मिळाला होता; परंतु अमेरिकेने त्याला ठार केले. या शेजारी देशाच्या विरोधात एक नाही तर शेकडो पुरावे समोर आले आहेत़ तरीही तो निर्लज्जपणे चेहरा लपवून आपली चूक मान्य करायला तयार नाही़ मात्र, जगाला माहित आहे, की जर असा कोणता देश आहे जो दहशतवादाचे सुरक्षित आश्रयस्थान असेल तर तो पाकिस्तान आहे, जिथे दहशतवाद आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिले जाते.

भारताच्या या चारही तरुण महिला अधिकाºयांनी पाकिस्तानची चांगलीच नांगी ठेचली आहे. तसेच, त्या देशाला जगासमोर उघडे पाडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *