Home उपराजधानी नागपूर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त १ ऑक्टोबरला ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त १ ऑक्टोबरला ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

19

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून १ ऑक्टोबर या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने शहरात नागपूर महानगरपालिका, नागपूर स्मार्ट सिटी आणि सिनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

१ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘सुपर ७५’ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येईल. सत्कारमूर्तींमध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिक, शासकीय पुरस्कार विजेते, ज्येष्ठ कलावंत, सेनेमध्ये कामगिरी करणारे सैनिक, सेवानिवृत्त अधिकारी, क्रीडा पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नागरिक, साहित्यिक, सामाजिक, वैद्यकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग राहील.

अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

तत्पूर्वी दुपारी ३.३० वाजता ज्येष्ठांतर्फे गीत गायन, नकला, मनोरंजन कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. सकाळी ७ वाजता रामनगर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे सूर्यनमस्कार स्पर्धा होईल. याच दिवशी मनपाने ‘बस फ्री राईड डे फॉर सिनियर सिटीझन’ घोषित केले आहे. यादिवशी संपूर्ण दिवस ज्येष्ठ नागरिक कार्ड धारकांना शहर बसमध्ये मोफत प्रवास राहील. यासोबतच याच दिवशी ज्येष्ठ नागरिकांना आपली बसमधून मोफत नागपूर दर्शन प्रवास घडविण्यात येईल. या प्रवासातून अजब बांगला, दीक्षाभूमी, स्वामी विवेकानंद स्मारक, झिरो माईल फ्रिडम पार्क आदी स्थळांचे दर्शन घडविण्यात येईल. मनपाच्या प्रत्येक झोन कार्यालयातून एक बस सोडण्यात येईल. यासाठी सिनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर सिटी या संस्थेचे सचिव सुरेश रेवतकर यांच्याकडे नोंदणी करावी,अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली. याशिवाय आंतरजातीय विवाह तसेच प्रेम विवाह करणाऱ्या ज्यांचे वय ७५ वर्षापेक्षा जास्त आहे अशा जोडप्यांचे देखील सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, मनपाचे परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती व घरबांधणी विशेष समिती सभापती हरीश दिकोंडवार, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सत्तापक्ष उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, सिनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूरचे सचिव सुरेश रेवतकर, वसंतराव पाटील, मनोहर खडसे, श्री वाकोडेकर, श्रीमती राऊत, श्रीमती महाकाळकर, माजी सैनिक संघटनेचे राम कोडके आणि पुंडलिक सावंत आदी उपस्थित होते.