ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरसदार यांचे निधन

पश्चिम महाराष्ट्र
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक द.मा.मिरसदार यांचे निधन झाले आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
द.मा. मिरासदार यांचा जन्म 14 एप्रिल 1927 साली झाला. साहित्य क्षेत्रात येण्याआधी ते पत्रकार होते. 1961 ते 1987 पर्यंत औरंगाबादमधील देवगिरी महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले. सत्यकथा मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या रानमाणूस या पहिल्या कथेपासून त्यांनी लेखन कारकिर्दीला सुरुवात झाली. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली
मुंबई : मराठी साहित्यात ग्रामीण विनोदाच्या रंग-ढंगातून रंगत आणणारे आणि लेखन, कथाकथनातून अस्सल गावरान, मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेणारे साहित्यिक म्हणून द. मा. मिरासदार यांची ‘मिरासदारी’ अबाधित राहील. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वाने निखळ आणि अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, द. मा. म्हणजेच दादासाहेबांनी मराठी साहित्यात आपल्या नावाप्रमाणेच मिरासदारी निर्माण केली. मराठीत ग्रामीण जीवनातील पार, कट्ट्यावरचा आणि अशा अनेक इरसाल नमुन्यांचा विनोदी खजिन्याचा पेटाराच दादासाहेबांनी उघडला. विनोदी लेखन, कथाकथन यातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मनमुराद हसवले. कथाकथनातून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेला.  त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्याने अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *