Home नवरात्रौत्सव देशभरात आजपासून नवरात्रौत्सव प्रारंभ, शिस्तीत मातेचे दर्शन

देशभरात आजपासून नवरात्रौत्सव प्रारंभ, शिस्तीत मातेचे दर्शन

42

नागपूर : महाशक्ती, आदिशक्ती भवानी मातेचा नवरात्रौत्सव आजपासून प्रारंभ झाला आहे. याशिवाय राज्य सरकारने आजपासूनच आपल्या राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे सुरू करण्याची परवानगी दिली़ मात्र, या सर्वांत कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

आज अश्विन शुद्ध प्रतिपदापासून शारदीय नवरात्रारंभ आदिशक्ती जगदंबेच्या प्राणपूजेचा महाउत्सव सुरू झाला आहे. दैत्य असुर भयानक उत्पात माजवला असताना सर्व देवांनी आपली शक्ती प्रदान करत जगत्जननी दुर्गेची निर्मिती केली. तिने सर्व असुरांचा संहार केला. नामजप, अखंड ज्योत, उपवास, घट स्थापना, सप्तशती पाठ नवचंडी हवन, कुमारिका पूजनांनी तिचे पूजन केले जाते.

याशिवाय नागपूर, कोल्हापूर, तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथील देवींच्या मंदिरात घटनास्थापना आणि पूजाअर्चा पार पडली. नागपुरातील आग्याराम देवी मंदिर, कोराडीतील कोराडी माता मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. कोल्हापुरातील माता लक्ष्मीमंदिर आणि तुळजापुरातील भवानी मातेच्या मंदिरात अनेकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

तसेच, राज्यभरातील श्री गजानन महाराज मंदिर शेगांव, शिर्डी येथील साईबाबा मंदिर, मुंबईतील सिद्धीविनायक, मुंबादेवी मंदिर यासह त्र्यंबकेश्वर मंदिर, पुण्यातील दगडूसेठ गणेश मंदिरही भाविकांनी फुलून गेले होते.

नाशिक जिल्ह्यातील माता सप्तश्रृंगी गडावरील मातेच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली. भाविकांनी शिस्तीत मातेचे दर्शन घेतले. सुमारे दीड वर्षानंतर मंदिर सुरू झाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.

अमरावती येथील माता अंबादेवी आणि एकविरा देवी घटस्थापना करून पूजाअर्जा करण्यात आली़ यावेळी भाविकांची मोठी गर्दी होती़ कोरोना संसर्गाविषयी नियम पाळून शिस्तीत दर्शन घेण्यात आले.

इगतपुरी तालुक्याचे श्रध्दास्थान
श्री घाटनदेवी मंदिर येथे नवरात्र उत्सवाची सुरुवात इगतपुरी नगरपरिषदचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी सपत्नीक घटस्थापना करुन केली.
याप्रसंगी डॉ. अर्जुन भोसले (उपविभागीय पोलीस अधिकारी), शक्ती साहेब (समृद्धी महामार्ग), ज्ञानेश्वर लहाने (अध्यक्ष, खरेदी-विक्री संघ),  वसंत पथवे (पोलीस निरीक्षक),  प्रजापती साहेब (अभियंता महावितरण) यांच्यासह विश्वस्त ताराचंद भरिंडवाल, भारत साळी, राजेश गुप्ता, शांताराम रिखे, नरेश गुप्ता, रामगोंविद यादव,किरण फलटणकर तसेच सतीश मोरवाल, शैलेंद्र शर्मा, पंकज परदेशी, राजु शेख, सागर परदेशी, संतोष जगदाळे, कृष्णा करवा, पवन छाजेड, सोनु भटाटे इत्यादी भावीक उपस्थित होते.


दरम्यान, कोरोना संसर्गामुळे मागील अनेक महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेले राज्यभरातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे आजपासून सुरू करण्यात आली आहेत. भाविकांना स्थानिक प्रशासनाने आखून दिलेल्या कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.