Home उपराजधानी नागपूर नागपुरात १७ ऑक्टोबरला १२५ चौकात झेंडागीत गायन

नागपुरात १७ ऑक्टोबरला १२५ चौकात झेंडागीत गायन

14

नागपूर : महानगरपालिका, खादी ग्रामोद्योग आणि खासदार क्रीडा सांस्कृतिक महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि झेंडा गीतचे रचियता श्यामलाल गुप्ता यांच्या १२५व्या जयंती निमित्त नागपुरातील १२५ चौकामध्ये झेंडा गीतचे सामुहिक गायन १७ ऑक्टोबर रोजी १०.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या कार्यक्रमात सामाजिक, व्यापारिक संस्थांचे सहकार्य लाभणार आहे.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेतर्फे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी आमदार प्रा. अनिल सोले, खादी ग्रामोद्योगचे सभापती जयप्रकाश गुप्ता, प्रो.राजेश बागडी, उपायुक्त विजय देशमुख, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर उपस्थित होते. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने आणि पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

महापौरांनी सांगितले की, मनपातर्फे स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्त तसेच श्यामलाल गुप्ता आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त १२५ चौकात झेंडा गीत गायनाचे कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग तर्फे भारतीय राष्ट्रध्वज देण्यात येणार आहे. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्या-त्या भागातील आमदार, नगरसेवक यांची उपस्थिती असेल. एकाचवेळी सर्व ठिकाणी झेंडा गीत एकस्वरात गायले जाईल. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी उपस्थित राहतील. यासाठी उपस्थित सर्व संस्थांनी मनपाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

शिक्षण समितीचे सभापती दिलीप दिवे यांनी प्रस्ताविकामध्ये कार्यक्रमाची माहिती दिली. लायन्स क्लबतर्फे जनजागृती रथ काढण्यात येणार आहे. नागविदर्भ चेम्बर ऑफ कामर्स, ताजाबाद ट्रस्ट, नागपूर चेम्बर ऑफ कामर्स लिमिटेड, तेजस्विनी महिला मंच, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, भारत विकास परिषद, मो.रफी मंच, सिंधी हिंदी विद्या समिती आदी संगठनेचे पदाधिकारी उपस्थित होते.