शेतीसाठी दिवसा बारा तास वीज पुरवठा नियमित करा : सुनील केदार

रानशिवार

NAGPUR : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते निसवण्याच्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीत त्यांचे शेतीचे वीज पुरवठा खंडीत करु नये. याकाळात शेतकऱ्यांना दिवसा बारा तास  नियमित विद्युत पुरवठा करा, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार [ MINISTER SUNEEL KEDAR URGED 12 HOURS ELECTRIC SUPPLY] यांनी दिल्या.

कामठी व मौदा तालुक्यातील विजेच्या लोडशेडींगमुळे धान पिकाचे होणाऱ्या नुकसानीबाबत उपाययोजनेसाठी विदर्भ को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी श्री. केदार  बोलत होते. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसवंर्धन सभापती तापेश्वर वैद्य, जि. प. सदस्या अवंतिका लेकुरवाडे, नरेश ठाकरे, कार्यकारी अभियंता श्री. दोडके, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या शेतीला या परिस्थितीत वीज पुरवठा खंडीत केल्यास पाण्याच्या अभावी धान पिकाचे अतोनात नुकसान होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना देयक [ ELECTRIC BILL ] अदा करण्यासाठी 15 दिवसाची सवलत देण्यात यावी. कोणतीही पुर्वसूचना न देता कनेक्शन कपात करु नये. अवैध पुरवठा धारकांचा लेखी अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

देयक वसूलीसाठी लवकरच शिबीराचे आयोजन करुन शेतकऱ्यांकडून वसूली करण्यात येणार आहे. यामध्ये प्रलंबित देयकांची रक्कम अदा करण्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी नागेश्वर नगर, शिवनी, नेरी, भूगाव आदी गांवाच्या समस्या मंत्री महोदयांनी जाणून घेतल्या. त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींनी चालु महिन्याचे विद्युत देयक तत्काळ भरावे, जेणेकरुन स्ट्रिट लाईट बंद होणार नाही व  ग्रामस्थांना रात्री ये-जा करतांना त्रासापासून मुक्तता मिळेल. बरेचशा गावात चुकीच्या रिडिंगच्या आधारावर अनियमित देयक देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत योग्य ती चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना श्री. केदार यांनी दिल्या. यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *