YOU MUST STOP ONE SECOND : रस्ता सुरक्षा आपली जबाबदारी

अपघात आणि विश्लेषण

वाहतुकीचे नियम तुमच्या आमच्या सर्वांच्या सुरक्षेसाठी आहेत. हे नियम पाळणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. आजची वाढती लोकसंख्या व जीवनाचा वाढलेला वेग यामुळे प्रत्येकाकडे एकतरी वाहन असतेच. वाहने आपल्या सोयीसाठी असते ते चालवताना काळजी घेणे ही जबाबदारी आहे. घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे याचे भान ठेवून वाहन चालवावे.

 

नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे प्राणहानीपेक्षा रस्ते अपघातात होणाऱ्या प्राणहानीचे प्रमाण जास्त आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. रस्ते अपघातांमध्ये भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. वर्षभरातील मृत्युपैकी 15 टक्के मृत्यु हे रस्त्यावरील अपघातामुळे होतात. अपघातात रोज चारशेहून अधिक मृत्यू होतात आणि बाराशेहून अधिक व्यक्ती जखमी होतात. खराब रस्ते व नियमांचे पालन न करणे हे त्यांचे मुख्य कारण आहे. मानवी चुकांमुळे होणारे अपघात थांबविणे आपल्या हातात आहे. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मृत्यूचे प्रमाण थांबण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

रस्त्यावरून पायी चालताना किंवा दोन चाकी, चारचाकी वाहन आणि प्रवास करताना स्वतःबरोबर इतरांनाही त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. यासाठी वाहतुकीचे काही नियम तयार करण्यात आले आहेत. याची माहिती प्रत्येक नागरिकाला असणे आवश्यक आहे. रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना इतर नागरिकांच्या जीवाला धोका होणार नाही. याची जाणीव झाली की, वाहतूक नियमांचे पालन आपोआपच होत जाते. याची जाणीव बालमनावर झाल्यास त्याचा प्रभाव दिसून येतो. मुलांना वाहतुकीच्या नियमांची माहिती करून दिल्यास पाल्य आपल्या पालकांकडून नियमांचे पालन करून घेत असते. 70 ते 80 टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात हे लक्षात घेऊन अपघातांची संख्या कमी करण्यासाठी गेल्या नऊ वर्षापासून नागपुरातील एक स्वयंसेवी संस्था “जनआक्रोश” कार्यरत आहे. जनआक्रोश शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस तसेच चौकांमध्ये पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे आणि प्रत्यक्ष संवादातून जनप्रबोधन करण्याचे काम करते.

रस्त्यावर चालताना काय करावे

रस्त्यावरून चालणाऱ्या प्रत्येकाने नियमांचे पालन केल्यास होणारे अपघात टाळता येतात. रस्त्यावरून पायी चालणाऱ्यांनी फूटपाथचा वापर करावा. ज्या भागात फुटपाथ नसेल तेथे नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे. पायी चालतांना वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच रस्ता ओलांडताना रस्ता दुभाजकावर ओलांडू नये, त्यासाठी झेब्राक्रॉसिंगचा वापर करावा. थांबलेला वाहनाच्या समोर किंवा पाठीमागून रस्ता ओलांडू नये. पायी चालताना सोबत लहान मुले असल्यास त्यांचा हात धरून चालावे.

सायकल चालवताना काय काळजी घ्यावी

गेल्या काही वर्षांत वाहनचालकांची संख्या वाढली असली तरीही सायकल चालणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. सायकलचा वापर मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले करीत असल्याचे आढळून येते, परंतु नियमांचे पालन न केल्याने कित्येकदा सायकलस्वार जखमी होतात तर काहींना जीव गमवावा लागतो. त्यामुळे सायकल चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे तितकेच आवश्यक आहे. सायकल चालविताना त्यासाठी वेगळा ट्रॅक असल्यास त्याचा वापर करावा. दोन किंवा अधिक सायकल समांतर चालवू नये. शक्य असल्यास सायकल चालवण्यासाठी असलेल्या हेल्मेटचा वापर करावा. दोन  किंवा अधिक सायकल समांतर चालवू नये. दुचाकी वाहनाला इतर सायकलला किंवा मालवाहू वाहनाला धरून सायकल चालवू नये. त्यामुळे तुमच्या जिवास धोका निर्माण होतो.

वाहने चालविताना घ्यावयाची काळजी

दोनचाकी व चारचाकी वाहन चालकाने वाहने चालविताना अधिक काळजी घ्यायची असते. या वाहनांची गती अधिक असल्याने जीवित हानीचे प्रमाण अधिक असते. वाहने चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. दुचाकीसाठी हेल्मेटचा वापर व चारचाकी चालविताना सीट बेल्टचा वापर करावा. वाहनांची नियमित देखभाल करावी ब्रेक सुस्थितीत आहे, याची खात्री करूनच वाहन रस्त्यावर काढावे. वाहन वळताना इंडिकेटरचा वापर करावा, वाहन थांबवून त्यांना योग्य इशारा द्यावा दुचाकी किंवा चारचाकी चालविताना मोबाईल फोनचा वापर टाळावा. दुचाकी चालविताना स्त्रियांनी ओढणी किंवा साडीचा पदर नीट वाचून घ्यावा.

एका दुचाकीवर दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी बसून प्रवास करणे टाळावे. चारचाकी मध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने सीट बेल्टचा वापर करावा. मद्यप्राशन करून गाडी चालवू नये. मालवाहू अवजड वाहन चालकांनी वाहन चालविताना लेनचा वापर करावा. क्षमतेपेक्षा जास्त माल वाहनात भरू नये. वाहन ओव्हरटेक करताना नेहमी उजव्या बाजूने करावे. या वाहतूक नियमांचे पालन केल्यास होणारे अपघात टाळता येतात. व कित्येक व्यक्तींचा जीव  वाचविण्यास यश मिळेल. हेल्मेटचा वापर करताना आयएसआय मार्क असणारे हेल्मेट वापरावे, ते हलक्‍या व चमकदार रंगाचे असावे. दर चार ते पाच वर्षांनी नवीन हेल्मेट घ्यावे. कारण हेल्मेटचे आयुष्य चार ते पाच वर्ष असते. त्यामुळे त्याचा कठीणपणा कमी होत जातो. हेल्मेटमुळे अपघातात डोक्याला इजा होत नाही. मेंदूपर्यंत इजा पोहोचण्याची शक्यता कमीत कमी असते. तसेच धडक बसल्यानंतर प्राणहानी होण्याची शक्यता कमी असते. लक्षात असू द्या, हेल्मेटची सक्ती दंड करण्यासाठी नसून तुमचा जीव वाचवण्यासाठी आहे.

 

श्याम भालेराव, उपाध्यक्ष, जनआक्रोश

(साभार : महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *