सर्व यंत्रणांनी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे : डॉ. नितीन राऊत

उपराजधानी नागपूर

नागपूर : आर्थिक वर्षाचे पुढील पाच महिने बाकी आहेत. सर्व कार्यान्वित यंत्रणांनी आपल्या विभागाचे प्रस्ताव योग्य नियोजन करून 15 नोव्हेंबरच्या आत सादर करावे, असे आदेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत [ UNION MINISTER NITEEN RAUT ] यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विमला आर., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यावेळी उपस्थित होते.

कोविड महामारीमुळे सर्व विभागाची कामे खोळंबली असून आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील योजनांच्या कामांना गती द्यावी, असे पालकमंत्री म्हणाले. नाविन्यपूर्ण योजनासह प्रलंबित योजनांच्या कामांचा प्रस्ताव सादर करावे. असे त्यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्याप्रमाणे आदिवासी बहुल दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मॉड्युलर प्रसुती केंद्र सुरू करावे. याबाबतचा सर्वांगिण प्रस्ताव सादर करावा. यामुळे गामीण भागातील जनतेस आरोग्य विषयक सुविधा मिळतील, असे ते म्हणाले.

कोविड महामारीमुळे कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या आजाराने ग्रासले आहे. या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या उपचारासाठी पोस्ट कोविड सेंटरची निर्मिती करण्यासाठी वैद्यकीय विभागाने परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावा, त्यास त्वरीत मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

खासगी दरांपेक्षा शासकीय संस्थांचे दर जास्त असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने काळजी घ्यावी. सर्व यंत्रणांनी ज्या कामासाठी निधी मागितला आहे त्याच कामासाठी निधी खर्च करावा. तसेच खर्चाचा ताळमेळ योग्यरितीने करावा, असे सूचना त्यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *