महिलांसाठी कृषी मंत्रालयाची मोठी घोषणा, कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव 

उतर महाराष्ट्र
  • राज्यातील महिला शेतकऱ्यांशी संवाद

धुळे : कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी या कालावधीत अन्नधान्यासह भाजीपाला घर पोहोच केला. या शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महिलांसाठी कृषी विभागाच्या योजना 30 टक्के राखीव असतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा व कृषी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी राज्यस्तरीय महिला किसान दिन कार्यक्रमाचे कृषी महाविद्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर प्रदीप कर्पे, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर, कृषी विभागाचे सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. बी. जोशी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. तुळशीराम गावित, प्रगतिशील महिला शेतकरी चंद्रकला वाणी, शोभा जाधव, प्रियांका जोशी, वंदना पाटील, भारती भदाणे आदी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले, कृषी योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंब प्रमुखांनी सातबारा उतारावर महिलांचे नाव लावून घ्यावे. त्यासाठीची प्रक्रिया सुलभ आहे. आठ दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महिला शेतकरी पिकवीत असलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ- मोठ्या शहरांची निवड करण्यात आली आहे. विपणन प्रक्रियेसाठी कृषी विभागाच्या साडेतीनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते दिवाळीपूर्वी शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतील.

प्रकल्पग्रस्तांचे एकही अर्ज प्रलंबित ठेवू नका : जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेत एक हजार रोपवाटिका देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेत महिलांनी शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे उपलब्ध करून द्यावीत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक त्या- त्या उपाययोजना करण्यात येतील, असेही कृषी मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

राज्यात फळे व भाजीपाला तसेच इतर पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावरील प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालय स्थापित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आगामी काळात कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना तातडीने मान्यता देण्यात येईल. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या मदतीचे दिवाळीपूर्वी वितरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आतापर्यंत 31 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 हजार कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. महिला शेतकऱ्यांनी कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतानाच स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असेही आवाहन कृषी मंत्री श्री. भुसे यांनी केले.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक महिला ठाणे निर्माण करा : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

महिला किसान दिनानिमित्त [ WOMAN FARMER DAY ] कृषी मंत्री श्री. भुसे यांनी राज्यातील महिलांशी ऑनलाइन संवाद साधत त्यांच्या अडी- अडचणी समजून घेतल्या. मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी नम्रता पराळ (ता. अंबरनाथ, जि. ठाणे), भावना निकम (दाभाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक), छाया दीपक चव्हाण (सावदा, ता. रावेर, जि. धुळे), कांचनताई परुळेकर (कोल्हापूर), जयश्री उज्ज्वल जोशी (औरंगबाद), साधना दीपक देशमुख (मुरुड, ता. जि. लातूर), जयश्री किशोर पारधी (जि. नागपूर) आदींचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *