पंतप्रधान आवास योजनेतून गरिबांना घरकुल 

उपराजधानी नागपूर

नागपूर : नागपूर शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत [ UNION MINISTER NITEEN RAUT] यांनी केली.

उत्तर नागपुरातील नारी, वांजरा व कळमना तसेच वर्धा मार्गावरील चिंचभुवन येथील जलकुंभांचे उद्घाटन डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी कळमना येथील जलकुंभाचे उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. राऊत यांनी अविकसित भागांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. जलकुंभाच्या बांधकामांवर सव्वासात कोटी रुपये खर्च झाले असून यातून 1 लाखावर लोकांना पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे. या जलकुंभांचे बांधकाम जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत नागपूर सुधार प्रन्यासतर्फे केले आहे. यावेळी नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, नासुप्रच्या मुख्य अभियंता लिना उपाध्ये, कार्यकारी अभियंता संजय पोहेकर उपस्थित होते.

डॉ. राऊत म्हणाले, कळमनासह वांजरा व नारा येथील पाण्याच्या टाक्यांचे जलकुंभांचे लोकार्पण झाल्याने या परिसरातील अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे. या तिन्ही टाक्यांमधून 50 लाख लिटर पाण्याचा पुरवठा प्रतिदिन होणार आहे. हा सर्व भाग अविकसित आहे. अजूनही नागरी सुविधा पूर्णपणे झालेल्या नाहीत. या भागातील नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधींनी अनेक कामांची मागणी केली आहे. या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक वर्गातील लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल देण्याचा प्रस्ताव नासुप्रतर्फे होणार आहे. या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. यात गडरलाईन, वाचनालये व उद्याने विकसित करण्यात येईल. उत्तर नागपूरमध्ये 2019-20 मध्ये जवळपास 30 ते 35 कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. 2020-21 या वर्षात जवळपास 85 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

उत्तर नागपुरातील पाण्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. राज्याचा ऊर्जामंत्रीपदाचा कार्यभार माझ्याकडे असल्याने या भागातील विजेच्यासंदर्भात असलेल्या समस्या सोडविण्याचे माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विजेच्यासंदर्भात आगामी काळात कळमना, सुगतनगर येथे सब स्टेशन आणि आंबेडकर उपकेंद्र येथे अतिरिक्त रोहित्र प्रस्तावित आहे. नवीन रोहित्र, रोहित्र क्षमता वाढ, 50 कि.मी. लांबीच्या उच्चदाब वाहिनी भूमिगत करणे इत्यादी कामे प्रस्तावित आहेत. या कामांची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय या भागातील वीज ग्राहकांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *