विदर्भात रस्त्यांचे भक्कम जाळे; महत्वाची शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार 

अमरावती

अमरावती :  श्रीक्षेत्र बहिरम येथे १ किलोमीटर दुतर्फा सेवा रस्त्यासाठी ३५ कोटी, मोझरी येथे वळण रस्त्यासाठी ११५ कोटी निधीबरोबरच मोर्शी, वरूड, चांदूर बाजार येथील बायपास मार्गासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. मेळघाटातील नियोजित रस्तेविकासाचे काम पूर्ण होण्यासाठी व वनविभागाच्या परवानगी आदी प्रलंबित प्रकिया पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

१९४५ कोटी निधीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ किमी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण व भूमीपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार डॉ. रणजीत पाटील, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवी राणा, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार दादाराव केचे, आमदार किरण सरनाईक, आमदार प्रताप अडसड, आमदार रामदास आंबटकर, महापौर चेतन गावंडे आदी उपस्थित होते.

४६४ कोटी निधीतून काटोल- वरुड राष्ट्रीय महामार्ग ४०.४७ किमी काँक्रिट रस्ता दुपदरीकरण,२६४ कोटी निधीतून तळेगाव- गोणापूर रा. म. ४३.४० किमी काँक्रिट रस्ता दुपदरीकरण, ३८६ कोटीतून नांदगावपेठ मोर्शी ४३ किमी काँक्रिट रस्ता दुपदरीकरण, ४७२ कोटीतून मोर्शी वरुड पांढुरणा ५२.३९ किमी काँक्रिट रस्ता दुपदरीकरण, २६६ कोटी निधीतून अंजनगाव परतवाडा बैतुल ४१.३६ किमी काँक्रिट रस्ता दुपदरीकरण आदी कामांचे लोकार्पण यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले.

त्याचप्रमाणे, ४४.४० कोटींतून अमरावती येथील एनएच ५३ वर वाय जंक्शनवर उड्डाण पूल, ४.९४ कोटी निधीतून रा. मा. क्र. ६ ते तळेगाव ठाकूर ब्राम्हणवाडा रस्त्यावरील पिंगळाई नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम व ४.८६ कोटीतून अमरावती बडनेरा रस्ता सुधारणा, ४.९४ कोटींतून महामार्गाला जोडणाऱ्या रहिमापूर वडनेर गंगाई रस्त्यावर पूल, १९.५५ कोटींतून प्ररामा-१२ ला जोडणारा धानोरा गुरव वाढोणा रस्त्याची सुधारणा, १३.९० कोटींतून रा. मा. क्र. ६ ला जोडणाऱ्या चांदुर बाजार ते सर्जापूर रस्त्यापर्यंत सुधारणा आदी कामांचे भूमीपूजन यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *