पोलादी पुरुष सरदार पटेल यांना जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

राजधानी मुंबई

मुंबई :  देशाचे पहिले उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री, पोलादी पुरुष, भारतरत्न, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून राज्यातील जनतेला राष्ट्रीय एकता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला अखंड, एकसंध, मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी सरदार पटेलांनी केलेलं कार्य अलौकिक असून त्यासाठी ते सदैव स्मरणात राहील. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अल्पावधीतच साडेपाचशेहून अधिक संस्थानांचं भारतात विलिनीकरण करुन त्यांनी अखंड, मजबूत, एकसंध देशाच्या निर्मितीचा पाया भक्कम केला. जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, बोलींची विविधता असलेल्या भारत देशाला एकत्र आणण्याचं आणि एकसंध ठेवण्याचं फार मोठं श्रेय सरदार पटेलांच्या दूरदृष्टीला, निर्णयक्षमतेला, कणखर नेतृत्वाला आहे. सरदार पटेलांना अपेक्षित पुरोगामी, प्रगतशील, सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या, सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या प्रगतशील भारताची निर्मिती करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी सरदार पटेलांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनी अभिवादन

माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी प्राणांचं बलिदान दिलं. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत त्यांनी अमूल्य योगदान दिलं. पाकिस्तानची फाळणी करुन बांग्लादेशची निर्मिती, आशियाई खेळांचं यशस्वी आयोजन, अलिप्त राष्ट्र शिखर परिषदेचं नेतृत्वं, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्वं करताना इंदिराजींनी दूरदृष्टी, राजकीय कौशल्याचं दर्शन घडवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात पायाभूत प्रकल्प उभे राहिले. विकासाचा पाया भक्कम झाला. त्यांच्या साहसी नेतृत्वानं देशाला महासत्तेच्या वाटेवर आणून देशाचा गौरव वाढवण्याचं काम केलं. इंदिराजी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वकालिन महान नेत्या. देशाचं कणखर नेतृत्वं म्हणून त्यांचं स्थान इतिहासात अजरामर आहे. देशासाठी त्यांनी केलेला त्याग, त्यांचं नेतृत्वं, कर्तृत्व, त्यांचं बलिदान देशवासियांना कायम प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय इंदिराजींच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *