मुंबईबाहेरही शिवसेनाचा झेंडा, दादरा हवेली लोकसभा पोटनिवडणुकीतून मोठा विजय

राजकारण

मुंबई, 2 नोव्हेंबर
महाराष्ट्राबाहेरील दादरा हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला आहे. या दोन्ही निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोर लावला असतानाच लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि देगलूर मतदारसंघात महाविकास आघाडीने केलेले सूक्ष्म नियोजन कमालीचे यशस्वी ठरल्याचे राजकीय जाणकारांनी म्हटले आहे.

भाजपाचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे दादरा हवेली लोकसभा पोटनिवडणूक घ्यावी लागली. पतीच्या निधनानंतर मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांनी शिवसेनामध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीतील विजय पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेना पूर्ण जोर लावला होता. अशातच आज लागलेल्या निकालात कमलाबेन यांनी तब्बल 51 हजार 9 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना एकूण 1 लाख12 हजार 741 मते मिळाली तर भाजपाचे उमेदवार महेश गावित यांना 63 हजार 382 मते मिळाली.


विशेष म्हणजे आजच्या निकालामुळे भाजपाला मोठा झटका बसला आहे. कारण यापूर्वी ही जागा भाजपाकडे होती़ मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे वातावरण बदलले, त्यांच्या पत्नीने शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि या पक्षाने ही निवडणूक म्हणजे अस्मिता, अशी भावना जोपासली आणि आता शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर वाटचाल सुरू केली. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात कमालीचा आनंद आहे. एकाच जल्लोषात त्यांनी भाजपाचा बालेकिल्ला शिवसेनेने जिंकला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची बाजी
दुसरीकड देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना 1 लाख 8 हजार 840 मते मिळाली तर भाजपाच्या सुभाष साबणे 66 हजार 907 मतांवर समाधान मानावे लागले. जितेश अंतापूरकर यांच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.

शिवाय काँग्रेस नेते तसेच मंत्री अशोक चव्हाण यांनी सूक्ष्म नियोजन करत प्रचंड मेहनत घेतली आणि विक्रमी विजय पदरात पाडून घेतला. या संदर्भात चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटले, की देगलूर पोटनिवडणुकीतील जितेश अंतापूरकर यांचा दणदणीत विजय ही स्व.आ. रावसाहेब अंतापूरकर यांना खरी श्रद्धांजली आहे. ४१ हजारांहून अधिक मताधिक्याचा हा विजय काँग्रेस व महाविकास आघाडीवरील महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतिक असून, मतदारांनी भाजपच्या द्वेषमूलक राजकारणाला चपराक लगावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *