दिवाळी उत्सव काळातील नकली मिठाईपासून सावध राहा, सरकारने दिला भेसळीचा इशारा

राजधानी मुंबई

MUMBAI CAPITAL : दिवाळी सणाच्या कालावधीत पॅकिंग फूड, खवा, मावा, मिठाई व इतर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम आखून नागरिकांना निर्भेळ व सकस पॅकिंग फूड, खवा, मावा व इतर अन्नपदार्थ मिळावेत याची खबरदारी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत घेतली जात आहे. मात्र जनतेनेही  मिठाई खरेदी करताना त्यावर बेस्ट बिफोर (Best Before) ची तारीख नमूद आहे किंवा कसे याबाबत खात्री करूनच मिठाई खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

उत्पादनाची तारीख आणि अन्न खराब होण्यापूर्वीची तारीख (Date of manufacturing and Best before date) बाबत अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार दि. 1 ऑक्टोबर 2020 पासून विना आवेष्टित /खुल्या स्वरूपातील मिठाई ज्या / ट्रे सारख्या भांड्यात विक्रीसाठी ठेवली आहे त्यावर best before तारीख नमूद करणे बंधनकारक असेल. अन्न व्यावसायिक हे या बाबी स्थानिक भाषेत नमूद करु शकतात.

मिठाई उत्पादकांना याबाबत वेळोवेळी बैठका घेऊन तसेच तपासणीवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. जनतेने मिठाई खरेदी करताना त्यावर बेस्ट बिफोर (Best Before) ची तारीख नमूद आहे किंवा कसे याबाबत  खात्री करूनच मिठाई खरेदी करावी. बेस्ट बिफोर (Best Before) निघून गेलेली मिठाई खरेदी करू नये तसेच  खरेदी केलेली मिठाई Best Before तारखेआधीच खाण्यात यावी. त्यानंतर ही मिठाई खाऊ नये. जेणेकरून विषबाधा सारख्या घटना रोखता येतील.

मिठाई खरेदी करून आणल्यानांतर मिठाईच्या साठवणूकीस योग्य अशा परिस्थितीनुसार (STORAGE CONDITION) साठवणूक करावी. बंगाली व तत्सम मिठाई फ्रीजमध्ये साठवून 8 ते 10 तासांच्या आतच खावी. वास, रंग व चव पाहून मिठाई ताजी असल्याची खात्री करावी.

मिठाई खरेदी करताना शक्यतो नैसर्गिक खाद्य रंग वापरण्यात आलेली मिठाई विकत घ्यावी. ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता, कृत्रिम खाद्यरंग वापरून मिठाई तयार करण्यात येतात. कृत्रिम  रंगाचे प्रमाण जास्त असलेल्या मिठाई खाण्याने कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. त्याकरिता अशा भडक रंगीत मिठाई खाणे टाळावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *