अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड विभागाला आग; १० जणांचा मृत्यू,१ जण अत्यवस्थ

पश्चिम महाराष्ट्र

FIRE ACCIDENT IN AHAMADNAGAR HOSPITAL : अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आज सकाळी साडेदहा वाजता शॉकसक्रिटमुळे आग लागली. या विभागात १७ कोविड रूग्ण दाखल होते. यापैकी दहा रूग्णांच्या होरपळून मृत्यू झाला तर १ रूग्ण अत्यवस्थ आहे. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे‌, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले [ DR RAJENDRA BHOSALE ] यांनी दिली.

जिल्हाधिकारी श्री.भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.

श्री.भोसले म्हणाले, नाशिक येथे झालेल्या गॅस गळतीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. मात्र, तरीही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

नाशिक विभागाचे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत दुर्दवी असून या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हा रुग्णालयास भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.दुर्घटना दिवसा घडली असल्याने त्याबद्दल चौकशीनंतर नेमकेपणाने वस्तुस्थिती समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

घटनेत मृत पावलेल्याच्या नातेवाईकांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येत असून चौकशीदरम्यान रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजची मदत घेणार असल्याने सत्य बाहेर येईल असे पालकमंत्री म्हणाले. या समितीमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. ज्यांनी हलगर्जीपणा केला असेल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई होईल. दुर्घटनेच्यावेळी रुग्णालयात अनुपस्थित असणाऱ्या संबधितांवरही कारवाई करण्यात येईल.  अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. गेल्या काही काळात स्वत: रुग्णालयाला तीन चार वेळा भेट दिली होती. आरोग्य सेवेसाठी पुरेसे अनुदान शासनाकडून देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. फायर ऑडिटरांच्या सूचनांची दखल घेण्यात येईल तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल असे ते म्हणाले. या घटनेची लवकरात लवकर चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

कठोर कारवाई करण्याचे निर्देश

मुंबई : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डातआज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *