अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत : राजेश टोपे

पश्चिम महाराष्ट्र
FIRE ACCIDENT IN AHAMADNAGAR HOSPITAL : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या कोविड अतिदक्षता कक्षाला आज सकाळी आग लागली. या कक्षात १७ रुग्णांवर उपचार सुरु होते, त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. इतर रुग्णही गंभीररित्या भाजले आहेत.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार संग्राम जगताप यांनीही घटनास्थळाला भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. या घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि मुख्य सचिवांशी चर्चा करून घटनेसंदर्भातली माहिती घेतली, तसंच रुग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांवरच्या उपचारात कोणतीही अडचण येऊ नये यासाठीची खबरदारी घ्यायचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी ट्विरवरवर म्हटले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आपल्या संवेदना या घटनेतल्या पिडित कुटुंबाच्या सोबत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. या घटनेत जखमी झालेले लवकर बरे होवोत, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. या दुर्घटनेबद्दल ऐकून आपल्याला मोठा धक्का बसला, आपल्या संवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत, जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होवोत. असे प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. या घटनेबाबचे वृत्त ऐकून आपण व्यथित झालो, मृत व्यक्तींना सद्गती लाभो, असे राज्यपालांनी ट्विटरवर म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *