प्रभाग ३१ च्या नगरसेवकांचा नागरिकांनी केला जाहीर निषेध

उपराजधानी नागपूर
नागपूर : अनेकदा अर्ज विनंत्या करूनही नागरी समस्या सोडविण्यास असमर्थ ठरलेल्या चारही नगरसेवकांच्या विरोधात आज प्रभाग ३१ मधील नागरिकांनी महावीर नगर मैदानावर निषेध सभा घेऊन आपला विरोध दर्शविला. [ MAHAVEER NAGAR NAGPUR NISHEDH ]
 प्रभाग ३१ मधील विविध परिसरातील रस्त्यांची दुर्दशा, गडरलाईनच्या समस्या, मैदानातील स्वच्छता, बगीच्यातील असामाजिक तत्त्वांचा वावर तसेच या ठिकाणी रात्री भरणारे ओपन बार यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी एकत्र येत माझं महावीर नगर या सोशल ग्रुपच्या माध्यमातून आज प्रभागाच्या चारही नगरसेवकांच्या विरोधात एल्गार पुकारला.
 उठा नगरसेवकांनो जागे व्हा जागे व्हा, जरा प्रभाग ३१ कडे एकदा डोळे उघडून पहा; रस्ते नाही स्वच्छता नाही गडरलाईनचीही बोंबाबोंब, प्रभागातील नगरसेवकांनो सोडा आता समाजसेवेचे ढोंग; प्रभाग ३१ च्या नगरसेवकांना जागा त्यांची दाखवूया, नुसत्या बाता करणाऱ्यांना आता घरातच बसवूया; बगिच्यात कचरा मैदानावर घाण, का करावे सांगा तुम्हाला मतदान? असे संदेश लिहिलेले फलक हाती घेत परिसरातील नागरिकांनी नारेबाजी करत प्रभाग ३१ चा नगरसेवकांचा जोरदार निषेध नोंदविला. शितल कामडे, डॉ. रवींद्र भोयर, उषा पायलट आणि सतीश होले असे चार नगरसेवक या प्रभागात आहेत. मात्र, त्यापैकी कोणीही प्रभागातील नागरी समस्यांकडे लक्ष देत नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे.
निषेध सभेत डॉ. रवींद्र भुसारी, अनिल गवारे, प्रदीप शिवणकर, महेश सव्वालाखे, श्रीकांत चवडे, अमोल भुसारी, मनोज बंड, महेंद्र शिवणकर, इंद्रभूषण बेलसरे, प्रदीप शिवणकर, संदीप पंडित, नितीन शिवणकर, सुधीर अन्नदाते, अभिजीत महात्मे, हेमंत सावळकर, रोशन गवारे, सिद्धांत नखाते, राजू बोरीकर, राकेश पंडित, हर्षद महात्मे या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *