अमरावतीत संचारबंदी लागू, इंटरनेट सेवा तीन दिवस बंद

अमरावती

 वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर न पडण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. अमरावतीमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.

अमरावती: महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये बंद दरम्यान हिंसाचाराच्या ताज्या घटनांनंतर शनिवारपासून संचारबंदी लागू केली असून, पुढील आदेशापर्यंत इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली. शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याबाबत माहिती दिली.

त्रिपुरा राज्यामधील घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी झालेल्या हिंसाचारानंतर अमरावतीमध्ये बंदचं आवाहन करण्यात आले होते. मात्र,शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मोठा जमाव रस्त्यावर उतरला. या जमावाने काही वेळातच दगडफेक आणि घोषणाबाजी सुरू केली. दुकानांवर दगडफेक करत तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जमावाला नियंत्रित करण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले की, हिंसाचाराला चिथावणी देणाºया अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा तीन दिवस बंद ठेवली जाईल.

पालकमंत्र्यांनी केले शांततेचे आवाहन
समाजातील सर्व घटकांनी अमरावती शहरात एकोपा व शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज केले. पालकमंत्र्यांनी शहरात ठिकठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व शांततेचे आवाहन केले. शहरातील घटनांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्रीमती ठाकूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासमवेत उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होत्या. त्यांनी यावेळी पोलीस व जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शथीर्चे प्रयत्न केले.

पालकमंत्र्यांनी शहरात सक्करसाथ, इतवारा, वसंत चौक, आॅटो गल्ली, वलगाव रोड, जमिल कॉलनी आदी विविध परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व सर्वांना शांततेचे आवाहन केले.

अमरावती शहर हे सांस्कृतिक लौकिक असलेले शहर आहे. विविध नवनव्या उद्योगांच्या उभारणीमुळे औद्योगिक शहर म्हणून विकसित होत आहे. अशा शहरात तोडफोड, दगडफेकीच्या घटना घडणे अनुचित आहे. शांततेचा भंग करणे, अफवा पसरवणे आदी प्रकार घडविणाºया गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल. सामान्य माणसाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सर्वपक्षीय नेत्यांनी शांतता निर्माण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार सुलभाताई खोडके,संजय खोडके, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जगदीश गुप्ता, दिनेश बूब, विलास इंगोले, बबलू शेखावत, जयंतराव देशमुख, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल आदी उपस्थित होते.

त्यानंतर पालकमंत्र्यांनी पोलिस प्रशासनाशी चर्चा केली व काटेकोर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्देश दिले. प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.
पोलिसांच्या वतीने ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *