ओबीसी व व्हीजेएनटी समाजातील दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महाज्योती करणार

पूर्व विदर्भ

चंद्रपूर : टीआरटीआयच्या माध्यमातून एसटी, बार्टीच्या माध्यमातून एस.सी व सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुलांना प्रशिक्षण देण्यात येते. आता, ओबीसी व व्हिजेएनटी समाजाच्या मुलांना प्रशिक्षणासाठी व त्यांच्या उत्थानासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ओबीसी व व्हिजेएनटी समाजातील दुर्लक्षित व शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महाज्योती करणार आहे, असे प्रतिपादन महाज्योतीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे आयोजित महाज्योतीमार्फत ऑनलाईन प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व डेटा सीम वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, खासदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महाज्योतीचे संचालक दिवाकर गमे, मुख्य लेखाधिकारी अतुल वासनिक,  लिनोवो कंपनीचे मॅनेजर निलेश सातफळे प्रामुख्याने उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना समाजात प्रतिष्ठा आणि सन्मानाची वागणूक मिळत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, पुणेसारख्या शहरात शिक्षणाच्या व प्रशिक्षणाच्या संपूर्ण सोयी आहेत. मात्र तेवढा खर्च ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी करू शकत नाही. आज महाज्योतीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम महाज्योती करीत आहे. सामान्य कुटुंबातील तसेच इतर विद्यार्थ्यांना याचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यासोबतच विद्यार्थ्याना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी 2022 पर्यंत 6 जीबी डेटा मोफत देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे सांस्कृतिक संचालनालयाचे आवाहन

पालकमंत्री पुढे म्हणाले, महाज्योतीची स्थापना बहुजनांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी करण्यात आली आहे. आज महाज्योतीच्या माध्यमातून यूपीएससी परीक्षेसाठी 1 हजार तर  एमपीएससी परीक्षेसाठी 2 हजार विद्यार्थी ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहे. पीएचडी करणाऱ्या  800 विद्यार्थ्यांना कमाल 5 वर्षासाठी विद्यावेतन देण्यात येणार आहे. जेईई व नीटच्या 3 हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत असून प्रशिक्षणाचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहे. ओबीसी प्रवर्गाला फक्त महाराष्ट्रातच स्कॉलरशिप देण्यात येते. त्यामुळे एससी, एसटीच्या धर्तीवर ओबीसीच्या मुलांना 100 टक्के स्कॉलरशिप देण्यात येईल. समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सिपेट या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून 10 हजार मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन नोकरी उपलब्धक करून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *