पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल

राजधानी मुंबई

मुंबई : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे संकट परतवून लावण्यासाठी कर्तबगार पोलिसांनी आणि इतर कर्मचारी यांनी केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे. पोलीसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगत, हल्ल्यातील शहीदांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गेट वे ऑफ इंडिया [ GATE WAY OF INDIA ] येथे श्रद्धांजली अर्पण करत अभिवादन केले.

पोलिस बॉईज चॅरिटेबल ट्रस्ट [ POLICE BOYS CHARITABLE TRUST ] संचलित महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शहीद वीरांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री वळसे-पाटील हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना बोलत होते.

मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, पोलिस कर्मचारी-अधिकारी कायम जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. आपल्या जीवाची आणि कुटूंबाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असतात. अशा पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका जनतेने ठेवावी आणि कोणतेही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रयत्न करावेत.

 

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते दहशतवादी हल्ल्यातील कामगिरीबद्दल मुंबई पोलिस संजय पाटील तर कोरोना काळात रुग्णांना दिलेल्या सेवेबद्दल श्रीमती पद्मावती, पांडुरंग चौघुले, मुंबई मनपाच्या सफाई कामगार विद्या जाधव, बेस्ट बसचालक संतोष कदम यांच्या कार्याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाळे, वरिष्ठ निरीक्षक कुसुम वाघमारे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

बॉईज संघटनेच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून शहीदांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीचा कार्यक्रम राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये आयोजित केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *