शेतकरी कामगार महा पंचायत मध्ये सामील होण्याचे जनतेला आवाहन

राजधानी मुंबई

मुंबई : २४ नोव्हेंबर 
केंद्रातील भाजपाच्या सरकारने अन्नदात्याची मोठी हालअपेष्टा केली. सत्तेत येण्यापूर्वी मोठी आश्वासने दिली पण सत्तेत येताचं भाजपाचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले. तीन काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र आखले होते त्याला विरोध करत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले शेवटी कायदे मागे घेत असल्याची घोषणा सरकारला करावी लागली. पण या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही म्हणून जोपर्यंत संसदेत तीन काळे कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा फुलप्रुफ कायदा सरकार आणत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्रने २७ व २८ नोव्हेंबर या कालावधीत शहीद किसान अस्थिकलश मानवंदना आणि संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीचे आयोजन केले आहे. यासंदर्भातील आयोजित पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक, डाव्या पक्षाचे प्रकाश रेड्डी, काँग्रसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, कॉम्रेड प्रकाश रेड्डी,कॉम्रेड शैलेंद्र कांबळे,कॉम्रेड एस. के.रेगे, कॉम्रेड विवेक मोन्टेरो,शेकापचे राजू कोरडे,जनता दल (सेक्युलर ) चे रवि भिलाणे, आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे, संविधानवादी रिपब्लिकन पक्षाचे विशाल हिवाळे यांच्यासह विविध पुरोगामी पक्ष संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नाना पटोले  म्हणाले की, काळ्या कायद्यांविरोधातील लढाईत शेतकऱ्याला मोठी किंमत मोजावी लागली आहे. वर्षभर हा संघर्ष चालला त्यात ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला. शेतकऱ्यांवर मोदी सरकारने प्रचंड अत्याचार केले. लाल किल्ल्याचे प्रकरण पुढे करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तर लखमीपूर खेरीमध्ये मोदी सरकारमधील गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकरी व एका पत्रकराला गाडीखाली चिरडून मारले. त्या मंत्र्यांची हकालपट्टी अजून झालेली नाही, ती झाली पाहिजे. देश व लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई सुरु आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक म्हणाले की, शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदींना मागे हटण्यास प्रवृत्त करुन कायदे रद्द करण्यास भाग पाडले. पण त्यासाठी ७०० शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. उत्तर प्रदेश,पंजाबमधील आगामी निवडणुकीत भाजपा हारणार असे दिसत असल्यामुळे मोदींना हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण शेतकऱ्याच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. एमएसपीचा कायदा बनवला पाहिजे, शेतकऱ्यांना स्वस्त वीज मिळाली पाहिजे आणि आंदोलनादरम्यान मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये द्यावेत या त्यांचा मागण्या आहेत त्या सरकारने मान्य कराव्यात. भाजपा हा शेतकऱ्यांचा पक्ष नाही तो शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष आहे.

प्रकाश रेड्डी म्हणाले की, लखीमपूर खेरी मधील हुतात्मा शेतकऱ्यांचा अस्थिकलश महाराष्ट्रात आणला जात असून २७ तारखेला तो मुंबईतील शिवाजी पार्क, चैत्यभूमी, बाबू गेणू स्मारक,मंत्रालय समोरील महात्मा गांधींचा पुतळा या पवित्र ठिकाणी नेण्यात येणार असून महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ त्याचा समारोप होईल. तर २८ तारखेला संयुक्त किसान मोर्चा आयोजित मेळावा होत आहे. या मेळाव्याला संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत, डॉ. दर्शन पाल, हनन मुल्ला हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना इतर राजकीय पक्ष शेतकरी व कामगारही हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *