Amit Deshmukh_file photo

‘दिव्यांग व्यक्ति अस्मिता अभियान’ राज्यभरात व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार

राजधानी मुंबई

मुंबई : राज्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र तसेच वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी दिव्यांग व्यक्ति अस्मिता अभियान व्यापक स्वरुपात राबविण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख [  MINISTER AMIT DESHMUKH ] यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्ति अस्मिता अभियान आणि  वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे.  याबाबतची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व अधिष्ठाता, दिव्यांग आयुक्तालयाच्या सहायक आयुक्त आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, दिव्यांग हक्क अधिनियम, 2016 नुसार सर्व 21 प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दिव्यांगाना प्रमाणपत्र राज्यभरात विशेष प्रयत्न केले जाणार असून यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग पुरेपूर सहकार्य करेल. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल.

महाराष्ट्रातील दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक असून यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे असे यावेळी खासदार श्रीमती सुळे यांनी सांगितले.

या अभियानामुळे राज्यस्तरावरील दिव्यांगाना विविध वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजना कार्यान्वित करणे सोयीचे होईल. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी देणे, विविध प्रोत्साहनपर योजना राबविणे, विविध प्रकारचे साहित्य, साधने आणि उपकरणांचा पुरवठा करणे सोयीचे होणार आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, परीक्षेतील सवलती मिळणे याबरोबरच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *