लता मंगेशकर दीदींच्या गायनाला तब्बल 80 वर्षे पूर्ण…

सिनेरंग ... चित्रपट / संगीत / नाटक / नृत्य

अख्ख्या जगाच्या स्वरकोकिळा, सर्वांच्या लाडक्या ‘भारतरत्न’ लतादीदी मंगेशकर यांनी आज 16 डिसेंबर 2021 रोजी आपल्या गायनाच्या कारकिर्दीला 80 वर्षे पूर्ण केली आहेत. लता दीदींनी ट्विटरवर आपल्या संगीतमय प्रवासाला 80 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपला आनंद चाहत्यांशी शेअर केला आहे.

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर म्हटले की, 16 डिसेंबर 1941 रोजी मी देवाचे, पूज्य माई आणि बाबांचे आशीर्वाद घेऊन रेडिओसाठी स्टुडिओमध्ये पहिल्यांदा दोन गाणी गायली. आज या गोष्टीला 80 वर्षे पूर्ण होत आहेत. मला जनतेचे अपार प्रेम आणि आशीर्वाद मिळाले आहेत. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमीच मिळत राहतील, असा विश्वास आहे.

भारताची शान
लता दीदींचे नाव गायनाच्या जगातील मोठे नाव आहे. त्यांनी छत्तीसहून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये भारतीय गाणी गायली आहेत. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि सर्वाेच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ मिळाला आहे. 92 वर्षीय लता मंगेशकर यांनी वयाच्या 12-13 व्या वर्षी गायनाला सुरुवात केली. चाळीशीच्या दशकापासून चित्रपटांमध्ये गायला लागलेल्या लता मंगेशकर यांनी काही वर्षांपूर्वीपर्यंत सातत्याने गाणी गायली होती़ मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या अलीकडच्या काळात गाण्यापासून दूर होत्या. त्यांची कारकीर्द खूप मोठी आहे, जवळपास सहा दशकांपासून त्यांनी अनेक मोठे हिट चित्रपट दिले आहेत. 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे जन्मलेल्या लता मंगेशकर यांना स्वरकोकिळा असे नामकरण मिळाले.

१९६० च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. या काळात लता दिदींनी जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांपैकी अनेक गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये ‘प्यार किया तो डरना क्या…’ हे ‘मुगल-ए-आजम’ चित्रपटातील नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे ‘अजीब दास्ताँ है…’ ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई (१९६०) मध्ये मीना कुमारीवर चित्रित गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले. १९६१ मध्ये दिदींनी सचिन देव बर्मन यांचे साहाय्यक जयदेव यांसाठी ‘अल्ला तेरो नाम…’हे भजन गाण्याचे पाऊल उचलून बर्मनदादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली.

 

इ.स. १९६२ मध्ये लता मंगेशकर यांनी ‘बीस साल बाद’ चित्रपटातील ‘कहीं दीप जले कहीं दिल…’ या हेमंत कुमार मुखोपाध्याय-दिग्दर्शित गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार सलिल चौधरी आणि हेमंतकुमारांची बांगला भाषेतली गाणीही म्हटली आहेत.

२७ जून १९६३ रोजी भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लता दिदींनी कवी प्रदीप लिखित आणि सी. रामचंद्र्र यांनी संगीतबद्ध केलेले ‘ऐ मेरे वतन के लोगों…’ हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. यावेळी दिदींच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाºया जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यांत अश्रू उभे झाले होते. इ.स. १९६३ मध्ये सचिन देव बर्मन यांच्याबरोबर पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर ‘गाईड’ (१९६५) मधील आज फिर जिनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल हे (किशोर कुमार सोबतचे द्वंद्वगीत) तसेच ज्वेल थीफ (१९६७) मधील ‘होठों पे ऐसी बात…’ यांसारखी बर्मनदादांची अनेक लोकप्रिय गाणी गायिली.

 

लता मंगेशकर यांनी संगीतकार मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी गायिली. यात ‘अनपढ’ ( १९६२) चे ‘आपकी नजरोंने समझा, वो कौन थी (१९६४) ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया ( १९६६) चे तू जहां जहां चलेगा…या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लता मंगेशकर यांनीच गायिली आहेत. १९६३ मधील ‘पारसमणी’ या लक्ष्मी-प्यारे जोडीच्या पहिल्या चित्रपटातील दिदींची गाणी लोकप्रिय ठरली. त्यांनी हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडके या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *