‘महाराष्ट्र फिल्म सेल’ने आपले संकेतस्थळ अधिकाधिक युजर फ्रेंडली करावे

सिनेरंग ... चित्रपट / संगीत / नाटक / नृत्य

मुंबई  : मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरती, माहितीपट, वेबसिरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगी महाराष्ट्र फिल्म सेलअंतर्गत एक खिडकी योजनेतून दिल्या जातात. येणाऱ्या काळात महाराष्ट्र फिल्म सेलने [ MAHARASHTRA FILMCELL ] आपले संकेतस्थळ (http://www.filmcell.maharashtra.gov.in) अधिकाधिक युजर फ्रेंडली करण्यावर भर द्यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

चित्रनगरी संदर्भातील आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे,  सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, अजय सक्सेना, सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री.देशमुख म्हणाले की, मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये विविध माध्यमांसाठी चित्रीकरण सुरु असते. अशा वेळी एक खिडकी योजनेचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. विस्तारीकरण करीत असताना एक खिडकी योजना नेमके काय आहे हे अधिकाधिक लोकांना समजणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र फिल्म सेलने आपले संकेतस्थळ अधिकाधिक युजर फ्रेंडली करताना याबाबतची सोशल मीडियावर प्रसिद्धी करावी.

राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते.त्यांच्या चित्रिकरणासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने उपलब्ध होण्यासह व्यवसाय सुलभतेसाठी (Ease of doing business) चित्रिकरणासाठीच्या आवश्यक असणाऱ्या 30 हून अधिक परवानग्या एक खिडकी योजनेतून देण्यात येतात. या योजनेअंतर्गत चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगी सात दिवसांच्या आत देण्यात येते. दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत या परवानगी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत असून निर्मात्यांना अटी शर्तीचे पालन करुन तसेच चित्रीकरणासाठी शुल्क भरुन परवानगी देण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *