महिलांच्या विकासाचे शिवधनुष्य उचलले आहे : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

राजधानी मुंबई

हिवाळी अधिवेशन 2021 विधान परिषद कामकाज  शक्ती कायद्याच्या स्वरुपात महिलांच्या विकासाचं शिवधनुष्य सरकारने उचलले आहे, यासाठी शासनाचे अभिनंदन करते, अशा शब्दात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भावना व्यक्त  केल्या.

विधानपरिषदेत महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या शक्ती फौजदारी कायद्याचा सुधारित विधेयकाचा प्रस्ताव गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधान परिषदेत मांडला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. हा प्रस्ताव मंजूर होत असतांना उपसभापती म्हणून आणि एक महिला म्हणून डॉ.गोऱ्हे  यांनी उभे राहून केलेल्या निवेदनाने सभागृहाचे वातावरण भावुक झाले होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, हा प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर झाला असला तरी त्याचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी अजुन टप्पे पार करायचे आहेत. राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या मान्यतेनंतर हा कायदा लागू होईल, मात्र जनतेच्या मनात तो आजपासूनच लागू झाला आहे अशी भावना आहे.  या कायद्याची निर्मिती ही एक ऐतिहासिक घटना असल्याचे सांगून उपसभापतींनी कायद्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी देखील विशेष काळजी घेतली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

संयुक्त चिकित्सा समितीचे सदस्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री  अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, यांच्यासह गृह विभागाचे अधिकारी आणि विधिमंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांचे त्यांनी विशेष आभार मानले.  विधानसभेत हे विधेयक मंजूर झाले असून एकमताने या विधेयकाला विधान परिषदेत मंजूरी देण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *