विधानपरिषद कामकाज : सरकारकडून आरोग्य विभागात 370 पदांच्या भरतीचे आश्वासन

राजधानी मुंबई

पदभरतीद्वारे आरोग्य सेवा अधिक बळकट : राजेश टोपे

मुंबई : राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदभरती,नव्याने इमारतींचा विकास तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दर्जाची ३७० पदे भरली जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे,अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत [ MAHARASHTRA VIDHANSABHA ] दिली.

विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे  यांनी राज्यातील आरोग्य विभागाशी संबधित  उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना श्री. टोपे बोलत होते.त्यांनी सांगितले की,  सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागा भरती प्रक्रिया सुरू आहे.शंभर टक्के रिक्त जागा भरती करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत विशेष तज्ञांच्या ८३३५ जागांपैकी ७९८१ जागांवर भरती करण्यात आली आहे. ३३५७ वैद्यकीय अधिकारी जागा भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी २६११ जागांवर भरती करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर ४६२ जागा पदोन्नतीने भरल्या आहेत. तर ३७० पदांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठवण्यात आले आहे.

२४ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ३०० खाटांची रुग्णालये खासगी सार्वजनिक भागिदारी तत्वावर चालवण्याबाबत त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र प्रत्येक जिल्हा रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.नवीन शासकीय रुग्णालय मंजूर झाल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात सामंजस्य करार करण्यात येत आहेत, असे श्री.टोपे यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.

लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यात येत आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा विकास कामांसाठी आशिया विकास बँककडून ५१७७ कोटी रुपये तर  हुडको कडून ३९९४ कोटी रुपये कर्ज घेतले जाणार आहे. यातून श्रेणीवर्धन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेल्या संस्थेचे बांधकाम, यंत्रसामग्री उपकरणे खरेदी, मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे श्री. टोपे यांनी सांगितले.

राज्यातील जुन्या आणि दुरुस्ती न होणाऱ्या रुग्णवाहिकांऐवजी नवीन एक हजार रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. वित्त आयोग निधी, खासदार निधी, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातूनही रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

या लक्षवेधीच्या चर्चेत सर्वश्री प्रविण दरेकर, डॉ.रणजित पाटील, गोपिचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.

 

कृषि विद्यापीठातील पदोन्नतीचा विषय लवकरच मार्गी लावणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदाच्या रिक्त जागा भरण्याबाबत कृषि विभाग कार्यवाही करत आहे. सध्या आवश्यकता तपासून तासिका आणि मानधन तत्वावर पदे भरण्याच्या सूचना कृषि विद्यापीठांना केल्या असून पदोन्नतीचा विषयही लवकर मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

विधानपरिषदेत सदस्य सतिश चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे कृषि विद्यापीठातील रिक्त पदांचा प्रश्न मांडला होता.

कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला आणि डॉ.बाळासाहेब सावंत कृषि विद्यापीठ, दापोली या चारही विद्यापीठात शिक्षक आणि शिक्षकेतरांची पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सध्या त्या पदांचा अतिरिक्त कार्यभार देऊन कामकाज करण्यात येत आहे. याशिवाय, पदोन्नतीची प्रक्रियाही गतीने राबविण्याच्या सूचना देण्यात  आलेल्या आहेत. रिक्त जागांची पदभरती करण्यासंदर्भातील प्रस्ताव  नियमाप्रमाणे तयार करुन त्याची कार्यवाही केली जाईल, या दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी आवश्यक कार्यवाहीच्या सूचना कृषि विद्यापीठांना देण्यात  येणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

या लक्षवेधीवरील चर्चेत श्री. चव्हाण यांच्यासह सदस्य शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *