महाराष्ट्रात गर्भवती महिलांच्या नोंदणीत वाढ …

आरोग्य

MUMBAI CAPITAL : आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत राज्यात गर्भवती महिलांचे पहिल्या तिमाहीतील नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. राज्यात 2014 च्या आधाराभूत माहितीनुसार गर्भवती महिलांचे पहिल्या तिमाहीतील नोंदणीचे प्रमाण ६३.५८ टक्के होते यात वाढ होवून 2019-20 च्या आधाराभूत माहितीनुसार  नोंदणीचे प्रमाण ८५.७२ झाले आहे.

आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडविण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने निती आयोगाने सोमवारी देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा ‘सर्वंकष आरोग्य निर्देशांक २०१९-२०’(चौथी आवृत्ती) जाहीर केला.

सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक

आरोग्य विभागाच्या योजना व कार्यक्रमांची जिल्हा स्तरावर प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्यातील जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक असते. यात महाराष्ट्राची स्थिती सुधारली असून राज्यात 2013-16 च्या आधारभूत माहितीनुसार मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिका-यांच्या स्थिर कालावधीचे प्रमाण 15.6 एवढे होते. 2017-19 च्या आधाराभूत माहितीनुसार हे  प्रमाण 18.55 एवढे  वाढले आहे. आरोग्य क्षेत्रात राज्य स्तरावरील महत्वाच्या अधिकारी पदाचा स्थिर कालावधीही याच कालवधित १०.५८ हून ११.१ झाले आहे.

बाल मृत्यूदर आणि नवजात बालकांच्या मृत्यू दरात घट

अहवालात 5 वर्षाखालील बालकांच्या मृत्यू दरात आणि नवजात बालकांच्या मृत्यूदरात घट आलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रणी राहिले आहे. 2015 च्या आधाराभूत माहितीनुसार राज्यात 5 वर्षाखालील बालकांच्या मृत्यू दराचे प्रमाण 1000 बालकांमागे 24 होते. हे प्रमाण घटून 2019-20च्या आधाराभूत माहितीनुसार 1000  बालकांमागे 22 एवढे झाले आहे. जन्मापासून 28 दिवसांपर्यंतची बालके नवजात बालक म्हणून गणली जातात. राज्यात 2014 च्या आधाराभूत माहितीनुसार नवजात बालकांच्या मृत्यू दराचे प्रमाण 1000 बालकांमागे 16 एवढे होते यात घट होवून 2019-20 च्या आधाराभूत माहितीनुसार 1000 बालकांमागे 13 एवढे झाले आहे.

संस्थात्मक प्रसुतीमध्ये वाढ

महाराष्ट्रात संस्थात्मक प्रसुतीमध्ये वाढ झाली असून परिणामी बाल व माता मृत्यूदरात घट झाली आहे. अहवालात नमूद 2015-16  च्या आधारभूत माहितीनुसार संस्थात्मक प्रसुतीचे  प्रमाण 85.3  टक्के एवढे होते. 2019-20 च्या आधाराभूत माहितीनुसार संस्थात्मक प्रसुतीचे  प्रमाण 91.19 टक्के एवढे  वाढल्याचे अहवालात नमूदआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *