महिला बचत गटांसाठी मंत्री यशोमती ठाकूर यांची महत्त्वाची घोषणा

अनुपमा... महिला विश्व

मुंबई : बचत गट हे महिला सक्षमीकरणाचे सशक्त माध्यम असून, महिला आर्थिक विकास महामंडळ आपल्या ई-बिजनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहे. ई- मार्केटिंगमध्ये महिला कमी पडू नयेत, यासाठी बचतगटाच्या उत्पादनांना माविममार्फत ऑनलाइन मार्केटिंगचे सर्व व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

माविम अंतर्गत बचतगटामार्फत तयार होणाऱ्या वस्तूच्या विक्री व प्रदर्शनबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस ‘माविम’च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, उपसचिव विलास ठाकूर आदी उपस्थित होते.

महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, ‘माविम’अंतर्गत बचतगटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळण्यासाठी नव माध्यमांचा वापर करावा. यासाठी बचतगटातील महिलांना पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटींग याबाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्यातील बचतगटातील महिलांचा त्यांच्या उत्पादनाची माहिती देणारा व्हिडिओ तयार करुन तो ऑनलाइन माध्यमावर प्रसृत करावा. यासाठी विभागाच्या सोशल मीडिया प्लॅटफॅार्मचा वापर करावा, असेही ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

राज्य, विभाग व जिल्हास्तरावर बचतगटांच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करावे व त्याबाबत वर्षभराचे नियोजन तयार करावे. कोविड प्रादुर्भावामुळे प्रदर्शन घेणे शक्य न झाल्यास, ऑनलाईन प्रदर्शनासाठी कायमस्वरुपी वेबपोर्टल तयार करावे. ‘माविम’ने नुकतेच वर्ल्ड एक्स्पो दुबई येथे तीन सामंजस्य करार केले. या सामंजस्य करारामुळे बचतगटाच्या महिलांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळाली आहे, असेही  ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *