चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या १८ इमारतींचे बांधकाम फेब्रुवारी २०२२ पर्यंत पूर्ण करावे

आरोग्य

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या एचएससीसी इंडिया लिमिटेड या सार्वजनिक उपक्रम कंपनीमार्फत महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणीचे काम सुरु आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच फेब्रुवारी 2022 पर्यंत रुग्णालय आणि महाविद्यालयाशी संबंधित असणाऱ्या एकूण 18 इमारतीचे काम पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख [ HEALTH EDUCATION MINISTER AMIT DESHMUKH ] यांनी दिले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव प्रकाश सुरवसे, एचएससीसी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख म्हणाले की, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एचएससीसी कंपनीची ‘टर्न की’ तत्त्वावर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे बांधकाम 24 महिन्यात पूर्ण करण्याबरोबरच पुढील 3 महिने यंत्रसामुग्री चाचणीसाठी ‘स्टॅबिलिटी’ कालावधी ठरविण्यात आला आहे. गेले काही दिवस कोविडमुळे बांधकाम कामावर परिणाम होत असला तरी आता वेगवेगळ्या 18 इमारतीच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. सध्या महाविद्यालय आणि रुग्णालयाचे 49 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या 6 महिन्याच्या काळात बांधकामाला गती देणे आवश्यक आहे. यासाठी एचएससीसी प्रतिनिधी यांनी वैद्यकीय शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण संचालक आणि उच्चाधिकारी समिती यांच्या सनियंत्रणात काम करण्याबाबतचे नियोजन करुन जून 2022 पर्यंत काम पूर्ण करण्यात यावे, असे निर्देशही श्री.देशमुख यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *