नायलॉन, सिंथेटिक मांजा विक्री करणा-यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

राजधानी मुंबई

नागपूर : प्रतिबंधित नायलॉन, सिंथेटिक मांजा आणि प्लास्टिक पतंग विक्री करणा-या दुकानांची तपासणी व त्यावरील कारवाई अधिक कठोर करण्याचे निर्देश वैद्यकीय आरोग्य विशेष समिती सभापती महेश (संजय) महाजन यांनी बुधवारी (ता.२९) दिले. तसेच मास्क न वापरणा-या नागरिकांवर कारवाई करण्याचेही निर्देश दिले.

आरोग्य विभागाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने बुधवारी (ता.२९) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, उपसभापती विक्रम ग्वालबंशी, सदस्य नागेश मानकर, सदस्या विद्या कन्हेरे, भावना लोणारे, उपायुक्त विजय देशमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, नोडल अधिकारी घनकचरा व्यवस्थापन डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, साथरोग अधिकारी डॉ.गोवर्धन नवखरे, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्यासह एजी एन्व्हायरो कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

महिला बचत गटांसाठी मंत्री यशोमती ठाकूर यांची महत्त्वाची घोषणा

 

नायलॉन मांजा संदर्भात नागपूर शहरात सुरू असलेल्या कार्यवाहीचा यावेळी आरोग्य समिती सभापतींनी आढावा घेतला. यासंदर्भात नोडल अधिकारी घनकचरा व्यवस्थापन डॉ.गजेंद्र महल्ले यांनी सविस्तर माहिती सादर केली. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने नागपूर शहरामध्ये नायलॉन मांजा विरोधात कारवाई करण्यात येत आहे. मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर पोलिस आणि मनपाच्या उपद्रव शोध पथकाची संयुक्त केंद्रीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीद्वारे दैनंदिन कारवाई सुरू आहे. याशिवाय मनपाच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांद्वारे झोननिहाय दुकानांची तपासणी करणे सुरूच आहे. नागपूर शहरात आतापर्यंत २८६७ प्लास्टिक पतंग, ५५ नायलॉन मांजा जप्त करून ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजाची अजूनही शहरातील बाजार भागांमध्ये विक्री सुरू असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. त्यामुळे सर्व झोनमध्ये अधिक कठोरपणे ही कारवाई करण्यात यावी, असे निर्देश आरोग्य समिती सभापतींनी दिले.

 

शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने होणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण, दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य

नायलॉन मांजामुळे होणारे अपघात, नागरिकांना होणारी इजा ही गंभीर बाब असून यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. उड्डाण पूलांवरून वाहतूक करताना मांजामुळे होणा-या घटना घडत असल्याचे दिसून येते. यावर उपाय म्हणून उड्डाण पूलावर उंचावरून सुरक्षात्मक दृष्टीने तार लावल्यास मांजा वरच अडकला राहिल त्यामुळे अपघात होणार नाही, अशी सूचना यावेळी उपसभापती विक्रम ग्वालबंशी यांनी मांडली. महाराष्ट्र विद्युत विभागाशी समन्वय साधून त्यांच्या सहकार्याने पूलांवर सुरक्षात्मकरित्या तार लावण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाजन यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *