मुंबईतील ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

राजधानी मुंबई

मुंबई : नवीन  वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ CM UDHHAV THAKARE ]  यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ फुटापेक्षा कमी असून त्यात राहणाऱ्या लाखो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.

बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, प्रधान सचिव नगरविकास महेश पाठक आदी उपस्थित होते.

सर्वात मोठी भेट : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबईकरांच्या  500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून 16  लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. अशा स्वरूपाचा मोठा निर्णय देशात कुठल्याही पालिकेने घेतला नसेल. मुंबईकरांसाठी महत्वाकांक्षी आणि क्रांतीकारी निर्णय असून नवीन वर्षाची मोठी भेट आहे असे सांगून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मनात मुंबईकरांसाठी तळमळ असून रुग्णालयात असूनही कोविड रोखण्यासाठीचे काम आणि इतर कामांच्या प्रगतीविषयी मुख्यमंत्री वेळोवेळी आढावा घेतात. कोविड काळात देखील विकास कामांना कात्री लावली नाही, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *