कोरोनाचे नियम पाळण्यात हलगर्जीपणा अजिबात करू नका : डॉ. नितीन राऊत

उपराजधानी नागपूर

नागपूर  : राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे हळूहळू नागपूर महानगर व जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेकडे अग्रेसर होत आहे. आपल्याकडे बेड, ऑक्सिजन, औषधी, वैद्यकीय मनुष्यबळ पुरेसे उपलब्ध आहे. अधिक रुग्ण वाढणार नाही, याची काळजी घेणे सर्वस्वी नागरिकांच्या स्वयंशिस्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे दोन डोस घेतल्याची खातरजमा करा; गरज नसताना गर्दी करू नका, यापूर्वी दोन लाटेत केलेल्या सहकार्याप्रमाणे प्रशासनाला मदत करा, असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. [ NITEEN RAUT AND COLLECTOR VIMALA R ]

कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस जिल्ह्यामध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक केबल नेटवर्क, सोशल मीडिया व माध्यमांवर बोलतांना आज जिल्ह्यातील जनतेला पालकमंत्र्यांनी संबोधित केले. यापूर्वी दोन लाटेत ज्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य केले, त्याच पद्धतीने व्यापारी, कर्मचारी, दुकानदार, वैद्यकीय अधिकारी यांनी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

गेल्या 20 डिसेंबरपासून 8 जानेवारीपर्यंत सुमारे 3 हजार व्यक्ती जिल्ह्यामध्ये बाधित झाले आहेत. बाधित होण्याची टक्केवारी 7.75 टक्केपर्यंत पोहोचली आहे. सध्या दररोज सातशे बाधित रुग्ण नवीन पुढे येत आहे. ही परिस्थिती गंभीर आहे. दवाखान्यात रुग्ण नाहीत, मृत्यू प्रमाणदेखील शून्य आहे. मात्र रुग्ण संख्या वाढल्यानंतर परिस्थिती चिघळू शकते. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे अतिशय आवश्यक आहे. मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनीटायझरचा वापर वाढविणे आवश्यक आहे.

कोविडवर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे लसीकरण. मात्र जिल्ह्यात अजूनही लक्षावधी लोकांनी दुसरा डोस घेतला नाही. त्यामुळे आपल्या बेपर्वा वृत्तीचा इतरांना फटका बसणार नाही, याची काळजी घेणे खूप आवश्‍यक आहे. तिसऱ्या लाटेवर नियंत्रण आणण्यासाठी नागपूर जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

जिल्ह्यातील आरोग्य उपाययोजनांची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी जनतेला दिली. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यामध्ये खाटांची संख्या 8 हजार होती. आता 27 हजार क्षमता करण्यात आली आहे. ऑक्सीजन क्षमता 680 मेट्रिक टन एवढी झाली आहे. सध्या मागणी फक्त 60 मेट्रिक टनची आहे. होमआयसोलेशन मधील बाधितांसाठी शहर आणि ग्रामीण भागात नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहे. अँन्टीजन व आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. सुमारे नऊ हजार चाचण्या दररोज करण्याची क्षमता आरोग्य यंत्रणेची आहे.

काही बेपर्वा नागरिक परिस्थितीचे गांभीर्य ओळखत नसल्यामुळे काल राज्य शासनाने नवीन कोविड प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. जिल्ह्यामध्ये रात्री अकरा ते सकाळी पाचपर्यंत संचारबंदी आहेत. तर पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचा जमाव करण्यास दिवसा मनाई आहे. शाळा-महाविद्यालय 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. याशिवाय शासकीय कार्यालय, महामंडळे यामधील उपस्थिती 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. सर्व प्रेक्षणीय स्थळे देखील बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

व्यापार-उद्योग बंद होऊ नये, ही आघाडी सरकारची भूमिका आहे.त्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक ऑनलाइन पद्धतीचा वापर करावा. विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी टाळावी, “मला काहीच होत नाही, मी लस घेणार नाही”, अशा अहंकारात जर कोणी विनाकारण फिरत असेल तर ते चुकीचे आहे. कृपया कोरोनाचे वाहक बनवून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका. आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जीपणा अजिबात करू नका, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी या सार्वजनिक उदबोधनात केले. जिल्हाधिकारी आर. विमला यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *