शिक्षण विभागातील मुख्य लिपिकावर एसीबी कारवाई

उपराजधानी नागपूर

नागपूर : नागपुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मुख्य लिपीक उपेंद्र शरदचंद्र श्रीवास्तव (52 वर्षे) यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी (लाच प्रतिबंधक विभाग) पथकाने रंगेहात पकडले.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे अंतरगांव बुजुर्ग तह. कोरपना जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून प्राजंली माध्यमिक विद्यालय नंदपा शाळेत चपराशी पदावर कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या नियुक्तीच्या वेळेस सदर शाळा अनुदानित नव्हती. 1 जुलै 2016 पासून शाळेला 20 टक्के अनुदान प्राप्त झाले. त्यानुसार तक्रारदाराने शासनाचे निर्णयानुसार 20 टक्के अनुदान मिळण्याकरिता प्रपत्र अ व ब भरून शाळेतील मुख्याध्यापक यांच्यामार्फत शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग यांचे कार्यालयात प्रस्ताव डिसेंबर 2018 मध्ये सादर केला होता. सदर प्रस्तावाबाबत तक्रारदार उपसंचालक यांच्या कार्यालयात संबंधित मुख्य लिपीक उपेंद्र शरदचंद्र श्रीवास्तव यांना भेटले असता त्यांनी तक्रारदारास वेतनाचे प्रपत्र अ व ब ची फाईल देण्याकरिता 50 हजार लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदविली.
यानंतर पोलिस निरीक्षक संजीवनी थोरात यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहनिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यानुार आज (7 जुलै 2020) पडताळणीदरम्यान श्रीवास्तव यांनी तक्रारदारास वेतनासंबंधी फाईल देण्याकरिता 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून बालाजीनगर चौक येथे रक्कम स्वीकारताना एसीबी पथकाने रंगेहात पकडले. यानंतर हुडकेश्वर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर व अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाईत पीआय संजीवनी थोरात, पीआय दिनेश लबळे, नापोशि प्रभाकर बले, पोशि अमर गणवीर, भागवत वानखेडे मपोशि रेखा यादव, निशा उमरेडकर, चालक पोहवा राजेश बन्सोड यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *