ज्येष्ठ संगीतकार रवी दाते यांचे निधन

रानशिवार

पुणे : दुभंगून जाता जाता, आताच अमृताची बरसून रात्र गेली अशा गझलांचे ज्येष्ठ संगीतकार रवी दाते (वय 81) यांचे मंगळवारी सायंकाळी आजाराने निधन झाले. दिवंगत भावगीत गायक अरुण दाते यांचे ते कनिष्ठ बंधू होते.
रवी दाते यांच्यावर मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यांची कोरोनासंबंधी चाचणी करण्यात आली होती; पण ती निगेटिव्ह असल्याचे सूत्रांनी सांगितले. उपचारादरम्यान त्यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगा समीर आणि मुलगी अश्विनी असा परिवार आहे.
समजुनी व्यथेला समजावता न आले… चंद्र आता मावळाया लागला… दुभंगून जाता जाता यांसारख्या त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गझला लोकप्रिय ठरल्या आहेत. रवी दाते यांनी भावगीताबरोबर गझल हाही प्रकार निवडला होता. त्यांनी सुरेश भट यांच्यासह अनेक गझलकारांच्या रचनांना संगीताचा साज चढविला होता. मराठी माणसाच्या भावविश्वात अजरामर असलेला ‘शुक्रतारा’ या भावगीतांच्या अनेक कार्यक्रमात त्यांनी गायक अरुण दाते यांना तबल्यावर साथसंगतही केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *