ग्रामपंचायत, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना भरीव निधी

(Last Updated On: July 17, 2020)

मुंबई : राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधित निधी काल प्राप्त झाला आहे. लवकरच हा निधी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरित केला जाईल. यापूर्वी इतक्याच रकमेचा अबंधित निधी प्राप्त झाला होता. त्यामुळे या आयोगाचा आतापर्यंत 2 हजार 913 कोटी 50 लाख इतका निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.                राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना अनुक्रमे 80:10:10 याप्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थासाठी पंधरावा वित्त आयोगानुसार 5 हजार 827 कोटी रुपये इतका निधी मंजूर आहे. त्यापैकी मागील महिन्यात 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपये अबंधित अनुदान (अनटाईड) निधी प्राप्त झाला होता व तो जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना कोणत्याही विकास कामावर खर्च करण्यासाठी यापूर्वीच वितरित केलेला आहे.
आता पंधराव्या वित्त आयोगाचा बंधित निधी 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपये प्राप्त झाला आहे. हा निधी बंधित असल्यामुळे तो फक्त पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आदी बाबींवर मार्गदर्शक सूचनेनुसार खर्च करण्यात येईल. लवकरच हा निधी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *