Home प्रादेशिक विदर्भ शेतकऱ्यांसाठी गोसीखुर्दचे पाणी उपलब्ध

शेतकऱ्यांसाठी गोसीखुर्दचे पाणी उपलब्ध

139

चंद्रपूर : पावसाळा सुरू होऊनही धान उत्पादकांना रोवणीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज असल्यामुळे राज्याचे मदत पुनर्वसन, मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोसीखुर्द प्रकल्पातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील काही दिवसात हे पाणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळेल.                                                                   चंद्रपूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गोसीखुर्द [indira sagar gose dharan] प्रकल्पातून पावसाळ्याच्या तोंडावर पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी घेतला आहे. यासंदर्भात गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्याला त्यांनी निर्देश दिले होते. स्वतः धान उत्पादक असलेले पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी रोवणीसाठी आवश्यक पाणी नसल्यामुळे रोवणीला विलंब होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली होती. धान उत्पादक शेतकऱ्यांना गोसीखुर्द प्रकल्पाचा लाभ मोठ्या प्रमाणात व्हावा, यासाठीचे नियोजन सध्या पालकमंत्री करीत आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून ज्यावेळी आवश्यकता असेल त्यावेळी शेतकऱ्यांना तातडीने पाणी मिळाले पाहिजे. पाण्याचे वाटप योग्य प्रमाणात व विविध भागात समानतेने झाले पाहिजे, यासाठी त्यांनी नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नागपूर निवासी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी गोसीखुर्द मधील पाणी रोवणीच्या काळातच शेतकऱ्यांना मिळावे, याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, मूल व अन्य तालुक्यांमध्ये या निर्णयाचा फायदा होणार आहे.             धान उत्पादक शेतकऱ्यांनी देखील आपल्या शेतामध्ये येणाऱ्या पाण्याचा वापर करत मोठ्याप्रमाणात रोवणी कामासाठी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोना संसर्ग काळामध्ये मोठ्या प्रमाणात धान उत्पादनाची गरज असून शेतकऱ्यांनी पुढील काळातील गरज लक्षात घेऊन धान उत्पादनाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. नुकतेच त्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांना आवाहन करीत मोठ्या प्रमाणात धान उत्पादन करण्याचे सुचविले होते. राज्यासह देशाला मोठ्या प्रमाणात पुढील काळामध्ये खाद्यान्नाची गरज असून यासाठी शेतकऱ्यांनी या काळात आवश्यकतेनुसार पीक पॅटर्न निवडावा. नगदी पिकांपेक्षा खाद्यान्‍नाला प्राधान्य द्यावे. धान उत्पादनाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here