नवी दिल्ली : संसदेच्या स्थायी समितीवर राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात शरद पवार यांना संरक्षण खात्याशी संबंधित समिती, उदयनराजे भोसले यांच्याकडे रेल्वे, माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना परराष्ट्र विषयक समितीवर नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना मनुष्यबळ विकास संसदीय समितीवर नेमण्यात आले आहे.
राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी नवनिर्वाचित सदस्यांना बुधवारी शपथ दिली़ त्यानंतर दुसºयाच दिवशी सदर नियुक्त्या करण्यात आल्या. यात महाराष्ट्रातून शरद पवार, उदयनराजे भोसले, प्रियांका चतुर्वेदी (वाणिज्य समिती), डॉ. भगवान कराड (पेट्रोलियम समिती), राजीव सातव (संरक्षण खात्याशी संबंधित समिती), भाजप नेते खा. विनय सहस्त्रबुद्धे यांचा समावेश आहे. त्यांना माजी खासदार सत्यनारायण जटिया यांच्या जागी मानव संसाधन विकाससंबंधी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे.
याशिवाय काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांना शहरी विकास संबंधित समितीचे सदस्य बनवण्यात आले आहे. वरिष्ठ काँग्रेस नेता मल्लिकार्जुन खरगे (वाणिज्यसंबंधी समिती), लोकसभाचे माजी उपाध्यक्ष एम. थम्बी दुरई (मानव संसाधन विकास), राज्यसभेचे माजी उपसभापती हरिवंश (कृषिसंबंधी समिती), ज्योतिरादित्य शिंदे (मनुष्यबळ विकास संसदीय), माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (रेल्वे समिती) यांचाही समावेश आहे.
दरम्यान, कोरोना संकटाच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे़ चीन आणि पाकिस्तानसोबत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यामुळे संरक्षण समितीकडे देशाचे लक्ष असेल. त्यामुळे सरकारपुढे यंदा कोरोना आणि भारत-चीन हे प्रमुख मुद्दे आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही समित्यांवर मराठी खासदारांची नेमणूक झाली आहे.