यंदाचा अभ्यासक्रम 25 टक्क्यांनी कमी : शिक्षणमंत्री

राजधानी मुंबई

मुंबई : कोविड १९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रचलित पद्धतीप्रमाणे शाळा सुरु झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी इयत्ता १ ली ते १२ वी चा इयत्ता निहाय, विषय निहाय २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्यात येत आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.                          राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (बोर्ड) यांच्या समन्वयाने आणि अभ्यासक्रम समितीच्या निर्णयानुसार संबंधित विषयाचे सर्व अभ्यासक्रम मंडळ सदस्यांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेवून प्राथमिक स्तरावरील २२, माध्यमिक स्तरावरील २० आणि उच्च माध्यमिक स्तरावरील ५९ असे एकूण १०१ विषयांचा इयत्ता निहाय, विषय निहाय २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्यात येत असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.                                                                                                                    निर्णय असा: पाठ्यक्रमातून २५ टक्के भाग वगळत असताना भाषा विषयामध्ये काही गद्य व पद्य पाठ व त्यावर आधारित स्वाध्याय कृती वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अंतर्गत मूल्यमापन आणि वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवर कोणत्याही कृती विचारल्या जावू नयेत. भाषा विषयामध्ये वगळण्यात आलेल्या पाठाला जोडून आलेले व्याकरण किंवा इतर भाषिक कौशल्य वगळण्यात आलेली नाहीत. विषयामध्ये कृतीची पुनरावृत्ती टाळणे तसेच काही भाग विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी देण्यात आला आहे. शालेय श्रेणी विषयासंदर्भात परिस्थिती व त्यानुसार उपलब्ध सोयी सुविधा यांचा विचार करून उपक्रम / प्रकल्प घेण्याबाबत सूचित केले आहे. प्रात्यक्षिकांवर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य हे अध्ययन – अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरूनच उपलब्ध परिस्थिती व सोयी सुविधा विचारात घेवून पूर्ण करणेबाबत सूचित केले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्फत शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. त्या दिनदर्शिकेमधून पाठ्यक्रमातून कमी करण्यात आलेला भाग वगळण्यात येत आहे. इयत्ता १ ली ते १२ वी चा इयत्ता निहाय, विषयनिहाय २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला भाग  वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येत आहे. शाळा प्रमुखांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सदर पाठ्यक्रम वगळल्याची नोंद घेवून त्याबाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *