Home साहित्य-संस्कृती ललित ...शब्दलालित्य प्रवाहातला डोह…Shabd Lalitya

प्रवाहातला डोह…Shabd Lalitya

90

सतत संतत वाहतो तो प्रवाह…! प्रवाहात असतो खळाळ, चैतन्य, प्रसन्नता. वेग आवेगाची परिसिमाही असते प्रवाहात़़़ अन् असतो प्रवाहात एक दिलदारपणाही…. तो वाहतो, सोबत येतील त्यालाही वाहवत नेतो…उथळ असेल तिथे खळखळाट वाढवतं अन् खोल असेल तिथून संथ, धीरगंभीर होऊन वाहत असतो प्रवाह. दोन किनाºयांच्या समांतरतेचा तोच असतो एकमेव साक्षीदार. या किनाºयाची ख्यालीखुशाली त्या किनाºयाला पोहचवणे अन् त्या किनाºयाची सुखदु:खे या तटाला पोहचवण्याचे एक अदृश्य कार्य करीत असतो प्रवाह, अगदी निरंतर. अन्यथा किनाºयांना कुठं लाभतं एकमेकांची गळाभेट घेणं. ते तर तठस्थ…! शुष्क डोळ्यांनी एकमेकांकडे पाहून गहिवरण्याखेरीज काहीच नसतं किनाºयांच्या हाती. प्रवाह त्याच्या या दुराव्यालाही जोडून ठेवतो. एकसंघ ठेवतो. तो कायम वाहतो या दोन्ही तटांना स्पर्शत त्यांच्यातील दुवा होऊन. भेट नाही घडवता येत ; पण या किनाºयाची स्पंदनं त्या किनाºयाला तो पोहचवत असतो नक्कीच.
कधी कधी याचअहंमपणाने उन्मादाने प्रवाह बेभान होतो. लय सोडून सुसाट धावत सुटतो किनाºयांनाही न जुमानता. प्रचंड वेग धारण केलेला हा प्रवाह मग भयावह भासू लागतो, भीती वाटते त्याच्या या रौद्ररुपाची प्रत्येकाला. त्याच्या अशा वागण्याने किनारेही खचतात. कोलमडतात, स्खलित होतात़.. कालपर्यंत संयमानं वाहणारा हाच का तो प्रवाह, अशा प्रश्नांकित भावनेनं.
उन्मादाचा हा लेप ओसरतो प्रवाह लज्जित होऊन पुन्हा आपल्या मूळरूपात येतो. पश्चातापाची सल जास्त टोचू नये म्हणून नव्यानं खळाळत नव गाणं गुणगुणू लागतो. पुढे कुणीतरी घालतो याच प्रवाहाला लगाम. बंद होतो त्याचा सागरातील विलनीकरणाचा मार्ग. ज्या ओढीनं तो धावत असतो त्याच ओढीला ओढून बांधून बंदिस्त केलं जातं. अडवलं जातं त्याला भक्कम तटबंदीच्या अजस्त्र विळख्यात. संचयाच्या हेतूनं. प्रवाहाचा कायापालट होतो. प्रवाह एका प्रचंड जलाशयात रुपांतरित होतो. आपला अवखळ खळखळाट विसरून तो ध्यानस्थ योग्यासारखा धीरगंभीर बनतो. त्याच्या विचारातही परिवर्तन घडतं. काय नुस्तं उनाडपणानं धावत मिठी मारायची त्या सागराला…? का उगाच हरवून टाकायचा आपला गोडवा कायमचा त्या सागरात मिसळून. त्यापेक्षा दुष्काळाच्या शुष्क दिवसात असावं आपल्याजवळ काही गोड संचित… या संचयाच्या साठवणीसाठी मग गोड मानली भोवतीची भक्कम तटबंदी़ ती भिंत, अडवून, साठवून ठेवणारी,धरून ठेवणारी… धरण म्हटली जाणारी .
संचयाच्या धरणातील भव्यता डोळे दिपवते नि वाटतं हाच समुद्र. हाच तर समुद्र . जलावरचे तरंग लाटा वाटू लागतात . थांबतो मग प्रवाह भूतकाळाचे दिवस आठवत. साचले जातात मग आतल्या आत गाळाचे थरावर थर . कुजणारं, गळणारं सारं काळजात साठलं जातं धरणाच्या. केवळ बंधाºयातूनचं वाहण्याचा पर्याय असतो धरणाच्या पाण्याला. कधीतरी होईल धरणाच्या पाण्याचा उपसा, होईल प्रचंड बाष्पीभवन. पश्चातापाच्या कुठल्याशा निचºयाने धरण गलितगात्र होईल, तळ गाठेल पण निराश होणार नाही. खोलीकरणात गाळ उपसला जाईल. जातील भरून गाड्यावर गाड्या अन् पसरवला जाईल हा गाळ ‘कस’ हरवल्या मातीवर. मिसळेल तो मातीच्या कणाकणांत अगदी खोल अन् मग या निकस मातीतूनही उगवून येईल हिरवंकंच पीक, दाणेदार बियाण्यांना झुलवणारं फुलवणारं… कारण धरणाच्या काळजातल्या कसदार स्वप्नांची ही किमया.
बस्सं! इथचं धरणाचा बांध फुटेल…प्रवाहित होईल प्रवाह, धावू लागेल त्याच्या डोहात साचलेलं सारं…
तसे प्रवाही नदीतही असतातचं खोल गहीरे डोह. वरवरं वाहणारे…. अहोरात्र, अविरत, वरवर तरंग मिरवत. डोहालाही छळतं असावं का त्याचं थांबलेपण…? कोण जाणे…?? उगाच वाटतं मीही त्या खळाळत्या प्रवाहातला, शापित साचला डोह…!!

उज्वला सुधीर मोरे
9552711968