आता शेतमजुरांनाही कौशल्य आधारित प्रशिक्षण मिळणार

(Last Updated On: July 30, 2020)

मुंबई : राज्यातील सुमारे १ लाख शेतमजुरांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या कापूस, मका पिकांसाठी फवारणीची कामे मोठ्या प्रमाणावर करावी लागणार असल्याने ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात कीटकनाशक फवारणीचे कौशल्य अधारित प्रशिक्षण शेतमजुरांना देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली.
शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटक महत्त्वाचा आहे. सध्याच्या पिक पद्धतीमध्ये औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी, सूक्ष्म सिंचनाची देखभाल दुरुस्ती, रोपवाटीकेतील कामे, नियंत्रित शेती, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी आदी कामे कौशल्यावर आधारित आहेत. याबाबत शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारण्यास मदत होईल.
शेतमजुरांचे कौशल्य वाढवणे, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना, सुरक्षितता व आरोग्य संरक्षण, कार्यक्षम व्यावसायिक सेवांची उपलब्धता, पर्यावरणपूरक कृषिपद्धतीस प्रोत्साहन व गुणवत्तापूर्ण शेतीमालाचे उत्पादन करण्यासाठी शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाबाबत संबंधित जिल्ह्यातील आत्मा प्रकल्प संचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून ग्रामीण भागातील शेतमजुरांनी नोंदणी करावी आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले आहे. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *