राज्यात आता आयटीआयन्स

(Last Updated On: July 31, 2020)

मुंबई : महाराष्ट्र सरकारने अन्य शासकीय संस्थांच्या तुलनेत मागे पडलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयला अधिक लोकप्रियता देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नसून वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात, हे विशेष. त्यामुळे देशातील ‘आयआयटीयन्स’ (भारतीय औद्योगिक संस्था) च्या धर्तीवर ‘आयटीआयन्स’ही पुढे संकल्पना पुढे येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत आॅनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून येत्या १ आॅगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज आॅनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तथापि आयटीआय महाविद्यालये कधी सुरू होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमानुसार माहिती जाहीर करण्यात येईल़ सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने सुरू करत असल्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
मोठी संधी
प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षांवरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदवणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना आॅनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा आॅनलाईन उपलब्ध दिले असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत आयटीआयसाठी अर्ज करावा. राज्यातील प्रत्येक युवकास कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर रोजगार देण्याचा शासनाचा निर्धार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाऊमेद न होता शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यमंत्री कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केले.
प्रवेशक्षमता
राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय आयटीआय आहे. ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता 92 हजार 556 इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी चार उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी दोन स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात ५६९ खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता 53 हजार 272 आहे. शासकीय आणि खाजगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *