Home राजधानी मुंबई अल्पसंख्याकांना आयटीआय प्रवेशासाठी मोठी संधी

अल्पसंख्याकांना आयटीआय प्रवेशासाठी मोठी संधी

84

मुंबई : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्याच्या अनुषंगाने यंदा राज्यातील 44 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीतील वर्ग चालविले जाणार आहेत. याबरोबरच 40 खाजगी आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या चालविण्यात येणार आहेत. या माध्यमातून 84 आयटीआयमध्ये एकुण 8 हजार 348 जागांवर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी उपलब्ध होत आहे. उद्या 1 आॅगस्टपासून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर सुरु होणाऱ्या नियमित आयटीआयच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेबरोबरच या वर्गांचीही प्रवेशप्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.                                                                           राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. या समुदायातील इच्छूक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थी नियमित आयटीआयसाठीही अर्ज करु शकतात. तसेच अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय आयटीआयमध्ये असलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीतील वर्गामध्ये सर्वसाधारण आणि इतर प्रवगार्तील विद्यार्थ्यांनाही 30 टक्के जागांवर प्रवेश दिला जाणार आहे, जेणेकरुन सर्व समाजातील विद्यार्थी एकत्र शिक्षण घेऊ शकतील, अशी माहिती मंत्री मलिक यांनी दिली. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता 44 शासकीय व 40 खाजगी आयटीआय मधून प्रवेशासाठी अनुक्रमे 197 व 189 तुकड्या या वर्षी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्याद्वारे एकूण 8 हजार 348 विद्यार्थी या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. शासकीय आयटीआयमध्ये 4 हजार 304 तर खाजगी आयटीआयमध्ये 4 हजार 044 जागा भरल्या जाणार आहेत, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.