Home साहित्य-संस्कृती काव्याभिलाषा झोका प्रीतीचा तू दे मला होवू दे श्रावण…

झोका प्रीतीचा तू दे मला होवू दे श्रावण…

283

   मला होवू दे श्रावण…

 

काळजाच्या झुल्यावर
आभाळाला भिडे मन
झोका प्रीतीचा तू दे
मला होवू दे श्रावण…

सरसर पावसाच्या
उतरती सोनसरी
चमचमत्या उन्हांची
गळ्यामध्ये गळसरी
गळाभेटीचा आपुल्याही
येवो असा गोड क्षण
मला होऊ दे श्रावण…

किती दिवसात सई
तुझी माझी भेट नाही
साठवले तुझ्यासाठी
मनामध्ये गुज काही
भेटू आता माहेराला
जगू थोडे बालपण
मला होऊ दे श्रावण…

आता वाटते धरती
जणू सजली नवरी
पतीदेव आभाळाचा
तिच्यावर जीव भारी
हिरवा अशाच रंगाचा
शालू सख्या मज आण
मला होऊ दे श्रावण…

आला उल्हास दाटून
भाव भरल्या मनात
वारा घालतो पिंगा
बघ पाचूच्या रानात
तुझी साथ सख्या मज
इंद्रधनूचे आंदण
मला होऊ दे श्रावण…

उज्ज्वला सुधीर मोरे
वाशिम
9552711968