बाळासाहेब थोरात म्हणाले, टेस्ट-ट्रेसिंग-ट्रीटमेंट त्रिसूत्रीवर काम व्हावे

उपराजधानी नागपूर

नागपूर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले साडेचार महिने शासनाची सर्व यंत्रणा काम करत आहे. दैनंदिन व्यवहार व अर्थव्यवस्था सुरळीत करण्यालासुद्धा प्राधान्य देणे आवश्यक आहे. अशा कठीण परिस्थितीत नागरिकांनी काळजीसह स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. कोरोना ग्रामीण भागात वाढीस लागला असून कोविड-19 वर मात करण्यासाठी टेस्ट, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याचे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, राजू पारवे, उपमहापौर मनीषा कोठे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.
कोरोनावर मात करण्यासाठी शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना श्री. थोरात यांनी केल्या. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांनी गर्दी न करणे, काळजी घेणे, जास्तीत जास्त चाचण्या करून घेणे व स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाच्या यशकथा तयार कराव्यात. नागपूरमध्येही उत्तम काम झाले असे सांगून प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे मंत्री थोरात यांनी कौतुक केले. आता शून्य स्थितीकडे जाणे हे लक्ष असून यासाठी 100 दिवसांत कोरोनामुक्तीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी कोविड संदर्भातील नागपूर विभागाचे सादरीकरण केले. विभागात सध्या 7 हजार 620 पॉझिटिव्ह रुग्ण असून 3 हजार 787 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये नागपूर राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे. नागपूर विभागात बेड व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, मनुष्यबळाची कमतरताही आहे. तपासणी वाढल्यामुळे रुग्ण संख्या वाढत असली तरी मृत्यूसंख्या कमी करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर शहरातील सहा वार्डात अँटीजेन तपासणी सुविधा सुरू असून शहरातील 38 वार्डात ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका आयुक्त मुंढे यांनी सांगितले. टेस्ट आणि ट्रेसिंग वर भर देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे राधास्वामी सत्संग या ठिकाणी सध्या 500 बिछाणे कार्यरत असून पाच हजार बिछाण्यांची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. खासगी हॉटेल सुद्धा रुग्णालयात परावर्तित करण्याबाबा चर्चा सुरू असल्याचे आयुक्त मुंढे यांनी सांगितले. ग्रामीण भागाच्या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी माहिती दिली. केवळ कामठीत 700 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. 8 हजार 139 कर्मचारी निरंतर सर्वेक्षण करत असून नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो, असे त्यांनी सांगितले. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *