रुग्णांकडून जादा खर्च वसूल करणे गंभीर

(Last Updated On: August 8, 2020)

मुंबई : खासगी रुग्णालयांतील ८० टक्के बेड्स राखीव न ठेवणे आणि रुग्णांच्याकडून अव्वाच्या सव्वा खर्च घेण्याच्या तक्रारी येत आहेत ही गंभीर गोष्ट आहे. जिल्हा प्रशासन आणि पालिकांनी याला तातडीने चाप लावत कडक कारवाई करावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
सर्व विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या दूरदृश्य बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावरून केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल बैठकीत सहभागी झाले होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मृत्यूदर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे. तसेच, कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेन्मेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे, असेही निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी विशेषत: मुंबईमधील प्रयत्नांविषयी समाधान व्यक्त केले़ राज्यातील कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांनी अधिक परिणामकारक उपाय योजावेत, असे त्यांनी सूचवले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सूचना केल्या. तसेच, प्लाज्मा थेरपीविषयी माहिती दिली. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *