Home उपराजधानी नागपूर नागपूर पोलिसांची कामगिरी प्रशंसनीय : गृहमंत्री

नागपूर पोलिसांची कामगिरी प्रशंसनीय : गृहमंत्री

269

नागपूर : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम नागपूर शहर पोलीस उत्तम प्रकारे करीत आहेत. त्यासाठी पोलीस विभाग राबवत असलेल्या उपाययोजना आणि उपक्रम प्रशंसनीय आहेत, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज व्यक्त केले.
नागपूर शहरांतर्गत कायदा व सुव्यवस्था, दाखल गुन्हे, प्रतिबंधक कारवाई, गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना आदीबाबत श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालयाच्या सभा कक्षात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, प्रभारी सहआयुक्त निलेश भरणे, अपर आयुक्त शशिकांत महावरकर, पोलिस अधीक्षक (नागपूर ग्रामीण) राकेश ओला, पोलिस उपायुक्त विनिता साहू, विवेक मसाळ, श्री. निलोत्पल, गजानन राजमाने, विक्रम साळी, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत आदी उपस्थित होते.
मंत्री देशमुख म्हणाले, की कोरोनाच्या संकट कालावधीत जनजागृती करुन चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या जबाबदारीसह वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची दुहेरी कामगिरी नागपूर शहर पोलिस पार पाडत आहेत. पूर्वी शहराला ‘क्राईम कॅपिटल’ म्हणून संबोधले जात होते; परंतु आता पोलिसांच्या उत्तम कामगिरीमुळे ही प्रतिमा बदलली आहे. नागपूर शहर तसेच ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश आले आहे. तसेच लॉकडाऊन काळात शेल्टर होममधील नागरिकांची विभागाने चांगली व्यवस्था केली. इतर राज्यातील नागरिकांना स्वगावी जाण्यासाठी रेल्वे तसेच बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली. या काळात शहरातील कोणतीही व्यक्ती उपाशी राहणार यासाठी कटाक्षाने लक्ष पुरविले.
सध्याचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे असून सायबर क्राईम, हॅकींग आदी प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी पोलीस आयुक्तांनी शहरासाठी स्वतंत्र ‘सायबर ठाणे’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारीला निश्चितच चाप बसेल, असा विश्वास श्री. देशमुख यांनी व्यक्त केला. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत विविध उपाययोजना तसेच उपक्रम राबविले जातात. ‘आॅपरेशन क्रॅकडाऊन’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. संशयित हालचाली किंवा सराईत असल्याचे आढळल्यास तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. ‘आॅपरेशन वाईप आऊट’अंतर्गत लपूनछपून अवैध धंदे करणाºयांविरुध्द धाडसत्र राबविण्यात येते. ‘गुन्हेगार दत्तक योजना’ कार्यान्वित असून येथील कर्मचारी नेमून दिलेल्या आरोपीची नियमित तपासणी करुन त्यांच्यावर पाळत ठेवतात, असेही ते म्हणाले.
यावेळी कोरोना संसर्गामुळे दगावलेले सहायक उपनिरीक्षक भगवान शेजुळ, तसेच हवालदार सिद्धार्थ सहारे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.