Home राष्ट्रीय मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट : पंतप्रधान

मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट : पंतप्रधान

80

नवी दिल्ली : देशातील 10 राज्यांमध्ये अँक्टिव्ह केसेसचे प्रमाण 80 टक्के आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात या राज्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार विविध राज्यांचे मुख्य सचिव उपस्थित होते.
एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या ७२ तासांत त्याच्या निकटसहवासातील व्यक्तींचे सर्वेक्षण चाचण्या केल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सुरुवातीचे ७२ तास महत्त्वाचे हे लक्षात घेऊनच ट्रेसिंग, टेस्टिंग वाढवावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
या राज्यांकडून कोरोना विरुद्ध करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे आणि अनुभवातून कोरोनावर एकत्रितपणे मात करणे शक्य होईल. ही १० राज्ये जिंकली तर देश जिंकेल असे सांगतानाच कोरोनामुळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. (महासंवाद)